Contact Banner

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्केटिंगचा सर्वात मोठा विक्रम; भुसावळच्या तिर्थराज पाटीलचा विशेष स्केटर म्हणून सत्कार

 

chhatrapati-sambhajinagar-skating-record-bhusawal-tirthraj-patil

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्केटिंगचा सर्वात मोठा विक्रम; भुसावळच्या तिर्थराज पाटीलचा विशेष स्केटर म्हणून सत्कार

१२० स्केटर्सचे सलग ७९ मिनिटे नॉन-स्टॉप स्केटिंग; ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमाची नोंद

लेवाजगत न्यूज भुसावळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत देशभक्ती, क्रीडाजिद्द आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला मिळाला. १५ ऑगस्ट रोजी विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे तब्बल १२० स्केटर्सनी सलग ७९ मिनिटे नॉन-स्टॉप स्केटिंग करून आंतरराष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली.

रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्या मान्यतेने, तसेच रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर आणि अंबे स्केटिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या विक्रमाचे आयोजन करण्यात आले.






कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय क्रीडा उपसंचालक मा. श्री. शेखरजी पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी मा. श्री. मुकुंदजी वाडकर यांच्या हस्ते झाले. तिरंग्याच्या साक्षीने १२० स्केटर्सनी दाखविलेली जिद्द आणि साडेतीनशे ते चारशे पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

भुसावळच्या तिर्थराज पाटीलचा विशेष सत्कार

या विक्रमाच्या कार्यक्रमात आठ वर्षे वयोगटातील सर्वोत्कृष्ट स्केटर म्हणून भुसावळ येथील एन. के. नारखेडे स्कूल व सिल्व्हर लाईन स्पोर्ट्स अकॅडमीचा विद्यार्थी तिर्थराज मंगेश पाटील याचा विशेष सत्कार करण्यात आला. विभागीय क्रीडा उपसंचालक शेखरजी पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंदजी वाडकर यांच्या हस्ते तिर्थराजचा सत्कार करून त्याचे अभिनंदन करण्यात आले.

अल्पवयातच स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत तिर्थराजने भुसावळचे नाव छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव भिकन अंबे, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफिसियल राधिका अंबे, गणेश बनसोडे, प्रियंका राजपूत तसेच साई अंबे, तेजस सोनाळकर, विवेक मालोदे आणि सुदीप तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या विक्रमामुळे छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा अध्याय निर्माण झाला असून, तिर्थराज पाटीलच्या विशेष सत्कारामुळे भुसावळच्या शिरपेचातही आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.