Contact Banner

सात हजारांची लाच घेताना आरटीओ एजंट रंगेहाथ जेरबंद

 

सात हजारांची लाच घेताना आरटीओ एजंट रंगेहाथ जेरबंद

जळगाव प्रतिनिधी-






जळगाव आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. दिव्यांग खाजगी वकिलाच्या कारचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी तसेच आरटीओतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी लाच मागणाऱ्या खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. योगेश रामभाऊ पाटील असे अटक करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे.

तक्रारदार ४१ वर्षीय दिव्यांग वकील यांनी १ जुलै २०२६ रोजी खान्देश मोटार शोरूममधून मारुती ऑल्टो के-१० कार खरेदी केली होती. ३ ऑगस्ट रोजी या वाहनाची तात्पुरती नोंदणी खासगी एजंट योगेश पाटील याच्यामार्फत करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने दिव्यांगांसाठी कारमध्ये विशेष हँडकीट बसवून घेतले.

वाहनाचे कायमस्वरूपी पासिंग करून घेण्यासाठी तक्रारदार १२ ऑगस्ट रोजी जळगाव आरटीओ कार्यालयात गेले असता त्यांची एजंट योगेश पाटील याच्याशी भेट झाली. कारचे कायमस्वरूपी पासिंग आरटीओ कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करून देण्यासाठी एजंटने सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ८ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदाराने याबाबत १७ ऑगस्ट रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करताना एजंट योगेश पाटील याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाचा वापर करून ८ हजार ५०० रुपयांऐवजी तडजोडीअंती ७ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवली.

यानंतर एसीबीच्या पथकाने इच्छादेवी चौकातील शोरूम परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपी योगेश पाटील याने तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलिस हवालदार सुनील वानखेडे आणि पोलिस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.