पामी शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश
पामी शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश
लेवाजगत न्यूज जळगाव : छातीत तीव्र वेदना, घाम येणे आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या यावल तालुक्यातील ६५ वर्षीय रुग्णाचे प्राण वेळेत करण्यात आलेल्या पामी (प्राथमिक अँजिओप्लास्टी) शस्त्रक्रियेमुळे वाचविण्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांना यश आले. तपासणीत हृदयाला रक्तपुरवठा करणारी महत्त्वाची कोरोनरी रक्तवाहिनी १०० टक्के बंद असल्याचे निदर्शनास आले होते.
यावल तालुक्यातील सुभाष नामक ६५ वर्षीय रुग्णाला अचानक छातीत तीव्र दुखणे, घाम येणे आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्कालीन विभागाने तत्काळ उपचार सुरू केले. हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली आणि डॉ. झिशान यांनी रुग्णाची तपासणी केली.
रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने ईसीजी, रक्त तपासण्या तसेच आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. तपासणी अहवालातून रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर करण्यात आलेल्या अँजिओग्राफीमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणारी एक महत्त्वाची कोरोनरी रक्तवाहिनी १०० टक्के बंद असल्याचे आढळून आले.
ही स्थिती अत्यंत गंभीर असल्याने उपचारास विलंब झाल्यास हृदयाच्या स्नायूंना कायमस्वरूपी नुकसान होण्याची तसेच रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे डॉक्टरांनी विलंब न करता पामी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली आणि डॉ. झिशान यांनी अनुभवी वैद्यकीय पथकाच्या सहाय्याने अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये यशस्वीरीत्या प्राथमिक अँजिओप्लास्टी केली. शस्त्रक्रियेदरम्यान बंद झालेल्या रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यात आला आणि आवश्यकतेनुसार स्टेंट बसवून रक्तप्रवाह पूर्ववत करण्यात आला.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून छातीतील वेदना कमी झाल्या आहेत. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू आहेत.
प्रत्येक मिनिट महत्त्वाचे
“हृदयविकाराच्या झटक्याच्या रुग्णांसाठी प्रत्येक मिनिट अत्यंत महत्त्वाचे असते. रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाल्यानंतर जितक्या लवकर उपचार केले जातात, तितके हृदयाचे नुकसान कमी करता येते. संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात आणण्यात आले आणि तातडीने पामी शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे किंवा डाव्या हातात वेदना जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी वेळ न दवडता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.”
— डॉ. अदनान अली, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय




कोणत्याही टिप्पण्या नाहीत