Contact Banner

धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न विविध क्रीडा स्पर्धांमध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

dhanaji-nana-mahavidyalaya-faizpur-national-sports-day-celebration


dhanaji-nana-mahavidyalaya-faizpur-national-sports-day-celebration


धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न

विविध क्रीडा स्पर्धांमध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

लेवाजगत न्यूज फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, भारतोलन आणि शक्तीतोलन आदी विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदेकर होते. प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे (जिमखाना समिती चेअरमन), उपप्राचार्य प्रा. डॉ. कल्पना पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोविंद सदाशिवराव मारतळे, प्रा. उत्पल चौधरी, प्रा. शिवाजी मगर, प्रा. दिलीप बोदडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. क्रीडा स्पर्धांमुळे महाविद्यालय परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा रावेर-यावल परिसराचे माजी आमदार श्री. शिरीषदादा मधुकरराव चौधरी तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी मागील वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयातील खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच क्रीडा क्षेत्रात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थी, खेळाडू व क्रीडाप्रेमींना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळासोबत अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. क्रीडा क्षेत्रात सातत्याने बदल होत असून विविध खेळांमधील नवीन नियम, विक्रम आणि घडामोडींची माहिती असणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकातून शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोविंद मारतळे यांनी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला. सन २००८ पासून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या खेळाडूंनी पदके मिळविली आहेत. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी मगर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. गोविंद मारतळे यांनी केले, तर आभार प्रा. दिलीप बोदडे यांनी मानले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदेकर, सर्व उपप्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोविंद मारतळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व खेळाडू तसेच आर. डी. ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.

क्रीडा दिनाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. अशा क्रीडा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण तसेच निरोगी जीवनशैली विकसित होण्यास निश्चितच मदत होणार आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.