Contact Banner

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याच्या कामाची चौकशी करा गुणवत्तेबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी; आमदार अमोल जावळेंच्या प्रशासनाला सक्त सूचना

 

raver-punkheda-patondi-road-quality-check-amol-javale

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याच्या कामाची चौकशी करा

गुणवत्तेबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी; आमदार अमोल जावळेंच्या प्रशासनाला सक्त सूचना

लेवाजगत न्यूज रावेर : रावेर तालुक्यातील रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू असतानाच कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी संबंधित प्रशासनाला रस्त्याच्या कामाची तातडीने पाहणी करून गुणवत्ता तपासण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.






रावेर व मुक्ताईनगर तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे रस्त्याचे काम शासनाने निर्धारित केलेल्या तांत्रिक निकषांनुसार आणि दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक आहे. मात्र, काम सुरू असतानाच त्याच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जळगाव येथील कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेले साहित्य, रस्त्याची जाडी, मजबुतीकरणाची प्रक्रिया, डांबरीकरणाची गुणवत्ता तसेच अन्य तांत्रिक बाबींची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात यावी, असे आमदार जावळे यांनी स्पष्ट केले आहे.

तपासणीदरम्यान कामात त्रुटी किंवा गुणवत्तेच्या बाबतीत कमतरता आढळून आल्यास संबंधितांकडून आवश्यक ती पूर्तता करून घेण्यात यावी. तसेच संपूर्ण रस्त्याचे काम शासनाच्या निर्धारित निकषांनुसार गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, अशा सक्त सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

“जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम दर्जेदार आणि टिकाऊ झाले पाहिजे,” अशी भूमिका आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.