मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दोन महिन्यांत ८ हजार ५५२ रुग्णांची तपासणी; ६८९ शस्त्रक्रिया यशस्वी
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दोन महिन्यांत ८ हजार ५५२ रुग्णांची तपासणी; ६८९ शस्त्रक्रिया यशस्वी
लेवाजगत न्यूज जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मोतीबिंदूमुक्त यावल तालुका’ या विशेष अभियानाला यावल तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १० जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत तब्बल ८ हजार ५५२ रुग्णांची ओपीडी तपासणी करण्यात आली असून, ६८९ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. मोतीबिंदूमुळे होणारे अंधत्व रोखण्यासाठी तसेच गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
जागतिक दृष्टिदान दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या अभियानात केवळ नेत्रविकारांची तपासणी न करता आवश्यकतेनुसार इतर आजारांचीही तपासणी केली जात आहे. रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार, औषधोपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जात आहे.
अभियानाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ८ हजार ५५२ रुग्णांची ओपीडी तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार ९२२ रुग्णांना आयपीडीमध्ये दाखल करून आवश्यक उपचार देण्यात आले. तपासणीदरम्यान मोतीबिंदू व इतर नेत्रविकार आढळलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आतापर्यंत ३७९ मेजर आणि ३१० मायनर, अशा एकूण ६८९ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत.
या अभियानाचा विशेष लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू तसेच ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. गावोगावी जाऊन नेत्रतपासणी केल्यामुळे अनेक नागरिकांमध्ये मोतीबिंदूचे निदान सुरुवातीच्या टप्प्यातच होत आहे. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्याने अनेक रुग्णांना पुन्हा स्पष्ट दृष्टी प्राप्त झाली असून, त्यांच्या दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला आहे.
या अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. यामध्ये डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे यांचा समावेश आहे.
यावल तालुक्यातील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत नेत्रसेवा पोहोचविणे, मोतीबिंदूमुळे होणारे अंधत्व रोखणे आणि ‘मोतीबिंदूमुक्त यावल तालुका’ हे उद्दिष्ट साध्य करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आगामी काळात ही मोहीम आणखी व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत