‘माय भारतचे मित्र’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला जागतिक युवा जोडणीची नवी दिशा
‘माय भारतचे मित्र’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला जागतिक युवा जोडणीची नवी दिशा
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर -
जगभरातील भारतीय वंशाच्या युवकांना भारताच्या विकासप्रवासाशी जोडण्यासाठी युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ व्यासपीठामार्फत ‘माय भारतचे मित्र’ हे विशेष डिजिटल मॉड्यूल सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी गांधीनगर येथे आयोजित ब्रिक्स युवा शिखर परिषद २०२६ दरम्यान या उपक्रमाची घोषणा केली.
भारताबाहेर शिक्षण घेणारे विद्यार्थी, युवा व्यावसायिक तसेच विविध समुदायांशी जोडलेले भारतीय वंशाचे युवक या माध्यमातून ‘माय भारत’शी जोडले जाऊन राष्ट्रनिर्मिती, स्वयंसेवा आणि युवा-केंद्रित उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.
ब्रिक्स युवा शिखर परिषदेत मार्गदर्शन करताना श्रीमती रक्षा खडसे यांनी युवकांनी जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार राहण्याची आणि त्यांना नेतृत्व, समाजसेवा व राष्ट्रनिर्मितीसाठी योग्य संधी उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. विविध देशांतील युवा नेत्यांशी संवाद साधताना त्यांनी परस्परांच्या अनुभवांतून शिकण्याचे महत्त्व सांगितले.
या वेळी गुजरातचे उपमुख्यमंत्री श्री हर्ष संघवी, खासदार डॉ. हेमांग जोशी, युवा कार्य विभागाचे अतिरिक्त सचिव श्री नितेश कुमार मिश्रा यांच्यासह ब्रिक्स आणि भागीदार देशांतील युवा नेते उपस्थित होते.
‘माय भारतचे मित्र’ या उपक्रमाद्वारे जगभरातील भारतीय युवकांना ‘माय भारतचा मित्र’ म्हणून नोंदणी करता येणार आहे. त्यांना त्यांच्या युवा मंडळाची किंवा युवा संघटनेची माहिती, संबंधित उपक्रम आणि कार्यक्षेत्राची माहिती नोंदविता येईल. शिक्षण, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन अशा विविध क्षेत्रांतील स्वयंसेवा संधीही या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
‘आपला भारत जाणून घ्या’ विभाग
या उपक्रमात ‘आपला भारत जाणून घ्या’ हा विशेष विभागही समाविष्ट करण्यात आला आहे. याद्वारे जगभरातील भारतीय युवकांना भारताची संस्कृती, वारसा, इतिहास, पर्यटन, भारतभेटीशी संबंधित माहिती तसेच देशाच्या प्रवासाला आकार देणाऱ्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांविषयी जाणून घेता येणार आहे.
यासोबतच ‘माय भारत’चे राष्ट्रीय महत्त्वाचे उपक्रम आणि कार्यक्रमही प्रदर्शित केले जाणार असून, भारताच्या युवा-केंद्रित विकासप्रवासाबाबत जागतिक भारतीय युवा समुदायामध्ये अधिक जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
‘माय भारतचे मित्र’ हा उपक्रम जगभरातील भारतीय वंशाच्या युवकांना भारताशी सातत्याने जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे. त्यांच्या ऊर्जा, कल्पना, कौशल्य आणि अनुभवांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेशी जोडणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
श्रीमती रक्षा खडसे म्हणाल्या, “भविष्यातील नेतृत्व त्यांचे असेल जे जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहेत. युवकांना नेतृत्व करण्यासाठी, आपल्या समुदायांची सेवा करण्यासाठी आणि राष्ट्रनिर्मितीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी योग्य संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. युवकांना योग्य दिशा आणि संधी दिल्यास ते भारताच्या उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया घडवू शकतात.”
‘माय भारत’विषयी
मेरा युवा भारत अर्थात ‘माय भारत’ हे युवा कार्य विभाग, युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय युवा व्यासपीठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याचा शुभारंभ करण्यात आला. सेवा, कर्तव्य आणि जनभागीदारी या मूल्यांवर आधारित ‘माय भारत’ युवकांना अनुभवाधारित शिक्षण, स्वयंसेवा, कौशल्य विकास, नेतृत्व, मार्गदर्शन आणि राष्ट्रीय मोहिमांशी जोडते.
युवकांना शिकणे, नेतृत्व करणे आणि योगदान देणे यासाठी सक्षम करत विकसित भारत २०४७च्या निर्मितीत त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हे ‘माय भारत’चे उद्दिष्ट आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत