गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज जळगाव: गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील वैद्यकीय-शल्यचिकित्सा परिचर्या विभागाच्या वतीने नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा. मनोरमा कश्यप यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या जनजागृतीपर उपक्रमातून अवयवदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना ‘अवयवदान – जीवनाची अनमोल भेट’ अशी होती. समाजामध्ये अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी जनजागृती करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या निमित्ताने ४० परिचर्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगणारे पोस्टर्स, फलक आणि प्रभावी घोषवाक्ये हातात घेऊन परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले. तसेच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि संभाव्य अवयवदाता होण्यासाठी आवाहन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. विशाखा गणवीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले. प्रा. जॅसिंथ धाया यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. यावेळी वैद्यकीय-शल्यचिकित्सा परिचर्या विभागातील प्राध्यापक तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन करण्यात आले.
‘एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते’, हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अवयवदानाबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम प्रभावी ठरला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत