जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रम
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रम
जळगाव | लेवाजगत न्यूज : गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागाच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना "निरोगी व शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान : प्रभावी उपक्रम अधिक बळकट करूया" अशी असून, स्तनपानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध शैक्षणिक, सर्जनशील आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाची सुरुवात १ ऑगस्ट रोजी उद्घाटन समारंभ व विषयपर मार्गदर्शनाने झाली. यावेळी स्तनपानाचे माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व तसेच निरोगी व शाश्वत जीवनशैलीसाठी स्तनपानाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ऑगस्ट रोजी झालेल्या पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण व आकर्षक पोस्टर्सद्वारे स्तनपानाचा संदेश प्रभावीपणे मांडला. ४ ऑगस्ट रोजी विषयाधारित रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक सादरीकरणातून स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित केले.
५ ऑगस्ट रोजी घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना स्तनपानाबाबत प्रभावी संदेश देण्याची संधी मिळणार आहे. ६ ऑगस्ट रोजी "स्तनपान जनजागृती व समर्थन" या विषयावर रोल प्ले सादर करण्यात येणार असून, त्यातून स्तनपानाशी संबंधित सामाजिक, आरोग्यविषयक आणि कौटुंबिक पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे.
सप्ताहाचा समारोप ७ ऑगस्ट रोजी विशेष परिसंवाद, समारोप समारंभ आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाने होणार आहे. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. विशाखा गाणवीर यांनी स्तनपान ही नवजात बालकासाठी सर्वोत्तम आहारपद्धती असून माता व बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी ती अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढण्यासोबतच समाजातही सकारात्मक संदेश पोहोचण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून, कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत