Contact Banner

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

 

godavari-health-city-80th-independence-day-celebration-jalgaon-2026

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी हेल्थ सिटी, जळगाव येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

ध्वजारोहण समारंभास डॉ. प्रशांत सोळंके, अधिष्ठाता, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल; डॉ. एन. एस. अर्वीकर, वैद्यकीय संचालक; प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड; होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यानंद आठवले; फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे डॉ. जयवंत नागुलकर; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर; डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादार; डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांच्यासह विविध संस्थांचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. एमबीबीएसच्या विद्यार्थिनी रिया सेलवानी यांनी मनोगत व्यक्त केले. आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. होमिओपॅथीच्या खुशी ठोंबरे व फिजिओथेरेपीच्या कु. समिक्षा गोपाळे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त देशभक्तीपर नृत्याने कार्यक्रमात विशेष रंग भरला.

यावेळी डॉ. प्रशांत सोळंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षण, सेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना, देशभक्ती ही केवळ भावना न राहता ती आपल्या कर्तव्य आणि कार्यातून दिसून यावी, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीतपर गीत सादर करण्यात आले. रेडिओलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. किरण पाटील यांनी ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. झाशांक जोशी यांनी केले.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे आयोजक प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून आणि अथक परिश्रमातून स्वातंत्र्यदिनाचा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.