Contact Banner

ग्रामसभेतील गोंधळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; गुन्हा दाखल करण्यासाठी संघटना आक्रमक

 

gram-sabha-chaos-after-gramsevak-dies-of-heart-attack-organization-aggressive-demanding-case-filing

ग्रामसभेतील गोंधळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; गुन्हा दाखल करण्यासाठी संघटना आक्रमक

पारोळा  प्रतिनिधी-


पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे सोमवारी (दि. १७




) झालेल्या ग्रामसभेत गोंधळ झाल्यानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. पी. एन. पाटील (मूळ रा. बोदडे, सध्या ओमनगर, पारोळा) हे शिवरे ग्रामपंचायतीत गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामसभेत काही ग्रामस्थ व तरुणांनी गावातील गेल्या दोन वर्षांतील विविध विकासकामे तसेच इतर कामांचा लेखाजोखा मागितला. यावेळी पाटील यांनी संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊन ग्रामस्थांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चर्चेदरम्यान वाद वाढून ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.

गोंधळ सुरू असताना पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने ते तेथून निघाले. त्यानंतर पारोळ्याकडे येत असताना काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेने केला आहे. पारोळ्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळ्याकडे हलवण्यात आले. मात्र, धुळ्याकडे नेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामसेवक संघटनेचे पारोळा, जळगाव, अमळनेर, भडगाव व पाचोरा येथील पदाधिकारी पारोळा पोलिस ठाण्यात दाखल झाले. ग्रामसभेतील सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाइल व्हिडिओ तपासून संबंधित संशयितांचा शोध घ्यावा आणि घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेने केली.

दरम्यान, मृत ग्रामसेवकाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामसेवक संघटना तसेच काही सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामसेवक पारोळा पोलिस ठाण्यात एकत्र येण्याची शक्यता आहे.

पोलिस ठाण्यासमोर तणाव

ग्रामसेवकाच्या मृत्यूनंतर सोमवारी दुपारपासून रात्रीपर्यंत पारोळा पोलिस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. रात्री साडेदहा वाजेपर्यंत ग्रामसेवक संघटना, नातेवाईक आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू होती.

घटनेतील दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच ग्रामसेवक आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.