भाऊबंदकीची एकजूट अन् निरोपाचा क्षण; अरुणावती नदीपात्रात कानबाई मातेचे विसर्जन
भाऊबंदकीची एकजूट अन् निरोपाचा क्षण; अरुणावती नदीपात्रात कानबाई मातेचे विसर्जन
शिरपूर प्रतिनिधी-
खानदेशची कुलदेवता असलेल्या कानबाई मातेला शिरपूर शहरासह तालुक्यात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. श्रावणातील पहिल्या रविवारी भक्तिभावाने प्रतिष्ठापना झालेल्या दीड दिवसांच्या कानबाई मातेच्या विसर्जनासाठी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
खानदेशातील कानबाई उत्सवाला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. रविवारी घरोघरी कानबाई मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या पारंपरिक ‘रोट’ पूजनासाठी भाऊबंदकी एकत्र येत असल्याने घराघरात उत्साहाचे वातावरण होते. प्रतिष्ठापनेनंतर रात्री भाविकांनी जागर केला. तसेच एकमेकांच्या घरी जाऊन मातेचे दर्शन घेत रोट प्रसादाचा आस्वाद घेतला.
महापूजा व आरतीनंतर विसर्जन मिरवणुका
सोमवारी सकाळी महापूजा व आरतीनंतर कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. शिरपूर शहरातील प्रमुख मार्गांसह ग्रामीण भागातही मिरवणुका दिमाखात निघाल्या. पारंपरिक वाद्यांचा गजर, टिपऱ्यांचा ताल आणि डीजेच्या तालावर अबालवृद्धांनी धरलेला ठेका यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
‘कानबाई माता की जय’च्या जयघोषात विसर्जन
सकाळपासून शहरातील व परिसरातील बहुतांश मिरवणुका अरुणावती नदीपात्राकडे मार्गस्थ झाल्या. **‘कानबाई माता की जय’**च्या जयघोषात भाविकांनी मातेचे नदीपात्रात विसर्जन केले. निरोपाच्या या क्षणी भाविकांमध्ये भक्तिभावासोबतच भावनिक वातावरणही निर्माण झाले होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
कानबाई मातेचा विसर्जन सोहळा शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी शिरपूर पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरासह विसर्जन मार्गावर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पडल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत