धक्कादायक! मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइल विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
धक्कादायक! मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइल विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
दामिनी पथकाची धाडसी कारवाई; विद्यार्थिनींना जाळ्यात ओढण्याचा डाव उधळला
जळगाव | प्रतिनिधी-
जळगाव पोलिसांच्या 'ऑपरेशन सजग' या विशेष सोशल एक्सपेरिमेंटदरम्यान शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका मुलींच्या शाळेबाहेर दामिनी पथकाने गुप्त कारवाई करत विद्यार्थिनींना दप्तरात सहज लपवता येतील असे मिनी मोबाइल विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईमुळे विद्यार्थिनींना गैरमार्गाला लावण्याचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आले.
गेल्या काही दिवसांपासून दामिनी पथकातील महिला पोलिस साध्या वेशात संबंधित शाळेबाहेर पाळत ठेवून होत्या. त्या स्वतः महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या वेशात परिसरात वावरत होत्या. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवत त्यांनी योग्य वेळी कारवाई करून मिनी मोबाइल विकणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून मिनी मोबाइल जप्त केले.
या घटनेमुळे पालक, शाळा प्रशासन आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारचे मिनी मोबाइल गैरवापरासाठी वापरले जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांचे आवाहन
- शाळा, महाविद्यालय, एसटी स्थानक किंवा रिक्षा थांब्यांजवळ संशयास्पद व्यक्ती अथवा मिनी मोबाइल विकणारे आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.
- पालकांनी आपल्या पाल्यांच्या हालचालींवर नियमित लक्ष ठेवावे.
- अनोळखी व्यक्तींकडून कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वीकारू नये, याबाबत विद्यार्थ्यांना समज द्यावी.
- छुप्या पद्धतीने मोबाइलचा वापर होत असल्याचा संशय आल्यास तातडीने पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करावी.
'ऑपरेशन सजग' अंतर्गत करण्यात आलेली ही कारवाई विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, अशा रॅकेटविरोधात पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत