दोन महिन्यांपूर्वी बहिणीचा मृत्यू... आता ट्रॉला अपघातात भावाचाही दुर्दैवी अंत
दोन महिन्यांपूर्वी बहिणीचा मृत्यू... आता ट्रॉला अपघातात भावाचाही दुर्दैवी अंत
नशिराबाद | प्रतिनिधी
भुसावळहून नशिराबादकडे येणाऱ्या पिकअप वाहनाला नशिराबाद टोलनाक्याजवळ भरधाव ट्रॉलाने दिलेल्या जोरदार धडकेत पिकअपमधून खाली पडलेल्या तरुणाचा ट्रॉलाच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. ५) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
मृत तरुणाचे नाव सोनू रामा बागले (वय २७, रा. भवानीनगर, नशिराबाद) असे आहे. सोनू हा मजुरीचे काम आटोपून पिकअप (एमएच-१९ बीएफ-६००१) मधून घरी परतत होता. नशिराबाद टोलनाक्याजवळ मागून भरधाव आलेल्या कंटेनर (जीजे-१५ एजे-४६२९) ने पिकअपला जोरदार धडक दिली. धडकेमुळे सोनू पिकअपमधून खाली फेकला गेला आणि दुर्दैवाने ट्रॉलाच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
कुटुंबावर दुसरा मोठा आघात
या अपघातामुळे बागले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच सोनूच्या बहिणीचे निधन झाले होते. त्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच आता सोनूच्या अकाली मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबातील लहान भाच्याची जबाबदारीही सोनूवर होती. त्यामुळे त्याच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत