जेईई अॅडव्हान्समध्ये ओम पाटीलची देशपातळीवर झेप; ऑल इंडिया रँक ६४०
जेईई अॅडव्हान्समध्ये ओम पाटीलची देशपातळीवर झेप; ऑल इंडिया रँक ६४०
आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश निश्चित; यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
लेवाजगत यावल : -यावल तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी ओम मनोजकुमार पाटील याने देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या जेईई अॅडव्हान्स २०२६ परीक्षेत ऑल इंडिया रँक ६४० मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या नेत्रदीपक कामगिरीच्या बळावर ओमचा देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. त्याच्या या यशामुळे यावल तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.
ओम हा आयटी अभियंता मनोज अरुण पाटील यांचा मुलगा, निवृत्त केंद्रप्रमुख अरुण रघुनाथ पाटील यांचा नातू तसेच डॉ. प्रशांत अरुण पाटील यांचा पुतण्या आहे. कुटुंबातील शैक्षणिक परंपरा आणि संस्कारांचा वारसा जपत ओमने कठोर परिश्रम, सातत्य, चिकाटी आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले.
जेईई अॅडव्हान्स ही देशातील सर्वाधिक कठीण आणि स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांपैकी एक मानली जाते. देशभरातील विद्यार्थी या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करतात. अशा अत्यंत तीव्र स्पर्धेत ऑल इंडिया रँक ६४० मिळवणे ही ओमच्या मेहनतीची आणि गुणवत्तेची पावती मानली जात आहे. आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळविण्याचे त्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार झाले आहे.
ओमच्या या यशामुळे त्याचे कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार तसेच यावल तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी ओमचे अभिनंदन करून त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या यशाबद्दल बोलताना ओमने पालक, आजी-आजोबा, शिक्षक आणि मार्गदर्शकांचे विशेष आभार मानले. सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवणे यामुळे हे यश मिळवता आल्याचे त्याने सांगितले.
ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत ओमने परिसरातील विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या या यशामुळे यावल तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक आणखी उंचावला असून, भविष्यात अभियांत्रिकी आणि संशोधन क्षेत्रात तो मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत