Contact Banner

रावेर आगाराला मिळाल्या ५ नव्या बस; श्रेयवादाचा प्रश्नच नाही : आ. नंदकिशोर महाजन

 

raver-st-depot-gets-5-new-buses-nandkishor-mahajan-amol-javale


रावेर आगाराला मिळाल्या ५ नव्या बस; श्रेयवादाचा प्रश्नच नाही : आ. नंदकिशोर महाजन

लेवाजगत न्यूज | रावेर- रावेर आगाराला नवीन बस मिळविण्यासाठी आमदार अमोल जावळे यांच्यासह आपणही प्रयत्न व पाठपुरावा केला आहे. आम्ही दोघेही भाजपचे आमदार असून पक्ष सत्तेत आहे. रावेर तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे बस मिळविण्यामागे कोणताही श्रेयवादाचा प्रश्न नाही, असा निर्वाळा विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांनी दिला.






रावेर आगारात राजमाता जिजाऊ योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या पाच नवीन बसच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

आमदार अमोल जावळे यांनी यापूर्वी रावेर आगाराला १० बस मिळाव्यात यासाठी शासनाकडे प्रयत्न व पाठपुरावा केला होता. त्यावेळी पाच बस मिळाल्या होत्या. आगारातील बसची कमतरता व प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन आमदार जावळे यांचा पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, २६ जुलै रोजी आमदार नंदकिशोर महाजन यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देऊन आणखी पाच बसची मागणी केली होती. त्यानुसार राजमाता जिजाऊ योजनेंतर्गत रावेर आगाराला पाच नवीन बस प्राप्त झाल्या.

या बसचा लोकार्पण सोहळा आ. नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, नगराध्यक्ष संगीता महाजन, बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, नगरसेवक राजेश शिंदे, राजेंद्र चौधरी, अरुण अस्वार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, लोकसभा क्षेत्र संयोजक सुनील पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘रावेरच्या विकासासाठी दोघांचाही प्रयत्न’

रावेर तालुका ही माझी कर्मभूमी असून रावेरचे दोन्ही आमदार भाजपचे आहेत. रावेर मतदारसंघाच्या विकासासाठी आमचा दोघांचा प्रयत्न राहणार आहे. हा श्रेयवादाचा विषय नसून कार्यकर्त्यांनी आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत, हे लक्षात ठेवावे, असे आ. नंदकिशोर महाजन यांनी सांगितले.

आमदार अमोल जावळे यांच्याशी रात्री लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र ते मुंबईत असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.

शेगाव बस पुन्हा सुरू करण्याच्या सूचना

रावेर आगारातून पूर्वी शेगावसाठी बससेवा सुरू होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही बस बंद असल्याने शेगावला जाणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दर गुरुवारी रावेर-शेगाव बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दर गुरुवारी शेगाव बस तात्काळ सुरू करण्याच्या सूचना आ. नंदकिशोर महाजन यांनी आगार प्रमुखांना दिल्या आहेत.

लेवाजगत न्यूज | रावेर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.