११ प्रशस्तीपत्रके, १७६ बक्षिसांसह ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्हा’ने गौरव कर्तव्यनिष्ठ सेवेची २९ वर्षांची गौरवगाथा; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रिता चौधरी यांची उल्लेखनीय कामगिरी
कर्तव्यनिष्ठ सेवेची २९ वर्षांची गौरवगाथा; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रिता चौधरी यांची उल्लेखनीय कामगिरी
११ प्रशस्तीपत्रके, १७६ बक्षिसांसह ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्हा’ने गौरव
खेमचंद पाटील | लेवा जगत प्रतिनिधी, मुंबई
कर्तव्यनिष्ठा, धैर्य, शिस्त आणि सेवाभाव यांची सांगड घालत पोलीस सेवेत तब्बल २९ वर्षे उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सौ. रिता मिलिंद चौधरी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्या नागरी हक्क संरक्षण पथक, ठाणे येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आजवर ११ प्रशस्तीपत्रके व १७६ बक्षिसे प्राप्त झाली असून, त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत १ मे २०२२ रोजी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (मेडल) व प्रमाणपत्राने त्यांना गौरविण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील साळवा येथील श्री. रमेश ढाके व सौ. चमेली ढाके यांच्या कन्या असलेल्या रिता चौधरी यांनी लहानपणापासूनच ध्येयवादी वृत्ती जोपासली. शालेय जीवनापासूनच त्यांच्यातील खेळाडूवृत्ती, नेतृत्वगुण आणि शिस्तप्रिय स्वभाव प्रकर्षाने जाणवत होता. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी एनसीसी (नौसेना)मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ‘बेस्ट कॅडेट’ हा बहुमान मिळविला. याच काळात आव्हानात्मक क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची जिद्द त्यांच्या मनात दृढ झाली.
महिलांसाठी पोलीस सेवेसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात प्रवेश करणे तुलनेने दुर्मीळ आणि धाडसी मानले जात असलेल्या काळात त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवत त्यांना भक्कम पाठिंबा व प्रोत्साहन दिले. आई-वडिलांचे संस्कार, आशीर्वाद आणि स्वतःच्या अथक परिश्रमांच्या बळावर १५ जुलै १९९७ रोजी त्यांनी ठाणे शहर पोलीस दलात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाने लेवा पाटीदार समाजातील महिलांसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला.
विवाहानंतरही त्यांनी आपल्या सेवाकार्यात सातत्य कायम ठेवले. त्यांचे पती श्री. मिलिंद रामचंद्र चौधरी (रा. ममुराबाद, जि. जळगाव) यांनी त्यांच्या सेवाप्रवासात खंबीर साथ दिली. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत पोलीस सेवेत प्रामाणिकपणे कार्यरत राहणे हे निश्चितच आव्हानात्मक होते. मात्र पती, दोन मुली आणि संपूर्ण कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांनी हे आव्हान समर्थपणे पेलले.
आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी विशेष शाखा, ठाणे; गुन्हे अन्वेषण विभाग; महिला तक्रार निवारण कक्ष तसेच राज्य गुप्तवार्ता विभाग अशा विविध महत्त्वाच्या विभागांत कार्यक्षमतेने सेवा बजावली. सध्या त्या नागरी हक्क संरक्षण विभागात कार्यरत आहेत. प्रत्येक ठिकाणी कर्तव्याप्रती निष्ठा, शिस्त, तत्परता, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव या गुणांच्या आधारे त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली.
त्यांच्या उत्कृष्ट सेवाकार्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दखल घेतली असून, ११ प्रशस्तीपत्रके आणि १७६ बक्षिसे ही त्यांच्या कार्याची ठोस पावती आहे. विशेषतः राज्य गुप्तवार्ता विभागातील गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना अनेक वेळा गौरविण्यात आले. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदानाची पोलीस विभागानेही दखल घेत १ मे २०२२ रोजी ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (मेडल)’ व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा गौरव केला.
आज सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या सौ. रिता मिलिंद चौधरी या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांचा प्रवास हा केवळ एका पोलीस अधिकाऱ्याच्या यशाची कहाणी नाही, तर महिला सक्षमीकरण, आत्मविश्वास, संघर्ष, कर्तव्यनिष्ठा आणि कुटुंबाच्या पाठबळातून उभ्या राहिलेल्या यशाची प्रेरणादायी गाथा आहे.
लेवा पाटीदार समाजातील महिलांसाठी त्यांची कारकीर्द निश्चितच अभिमानास्पद आणि दिशादर्शक आहे. प्रतिकूल परिस्थितींवर मात करत ध्येयाच्या दिशेने सातत्याने वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते, याचे प्रेरणादायी उदाहरण त्यांच्या कार्यातून दिसून येते.
सौ. रिता मिलिंद चौधरी यांच्या उल्लेखनीय कार्याचा लेवा पाटीदार समाजाला सार्थ अभिमान असून, त्यांच्या पुढील सेवा प्रवासासाठी आणि समाजहिताच्या कार्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!




कोणत्याही टिप्पण्या नाहीत