कोथळी येथे भागवत कथा, संत मुक्ताई चरित्र कथेसाठी ध्वजारोहण बुधवारपासून संत मुक्ताई चरित्र व भागवत कथा ज्ञानयज्ञाला प्रारंभ
कोथळी येथे भागवत कथा, संत मुक्ताई चरित्र कथेसाठी ध्वजारोहण
बुधवारपासून संत मुक्ताई चरित्र व भागवत कथा ज्ञानयज्ञाला प्रारंभ
प्रतिनिधी । मुक्ताईनगर
आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान श्री संत मुक्ताई जुने मंदिर, कोथळी येथे अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र कथा, संगीत श्रीमद् भागवत कथा तसेच ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याची सुरुवात रविवारी, २३ ऑगस्ट रोजी विधिवत ध्वजारोहणाने करण्यात आली.
सतपंथ आचार्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध संत-महंत, महाराज तसेच मान्यवरांची उपस्थिती होती. या सोहळ्याची माहिती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सप्ताहादरम्यान दररोज पहाटे ४ वाजता काकडा आरतीने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असून रात्री १० वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, हरिनाम संकीर्तन व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
सप्ताहात रमेश महाराज (आडविहीर), धनराज महाराज (अंजाळे), शास्त्री भक्तिप्रियदास (सावदा), कन्हैया महाराज (बऱ्हाणपूर), आचार्य मानेकरबाबा (सावदा), संत गोपालचैतन्य महाराज (पाल) तसेच महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज (फैजपूर) यांची प्रवचन सेवा लाभणार आहे.
२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. या धार्मिक सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
राजकीय शक्तिप्रदर्शन नाही : अरुण गुजराथी
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी या सोहळ्याबाबत स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, हा कार्यक्रम वैयक्तिक आणि पूर्णतः आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. या सोहळ्याला कोणत्याही प्रकारचे राजकीय स्वरूप किंवा राजकीय शक्तिप्रदर्शन नाही. संत मुक्ताई यांच्या पावन भूमीत होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी भक्तिभावाने लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित या सप्ताहामुळे कोथळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, संत मुक्ताई चरित्र व भागवत कथेतून भाविकांना अध्यात्मिक ज्ञान आणि संस्कारांची पर्वणी मिळणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत