शहीद जवानांच्या परिवारांसाठी महादेव हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर
शहीद जवानांच्या परिवारांसाठी महादेव हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर
जळगाव : ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून जळगाव येथील महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शहीद जवानांच्या परिवारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या उद्देशाने सर्व विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन वीरमाता अनुसयाबाई शिंदे, वीरपत्नी व माजी सैनिक तसेच माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सैनिक सेलचे सी. डी. पाटील, श्री. बडगुजर, जी. एम. फाउंडेशनचे उदय भालेराव, गिरीष भाऊ पितांबर भावसार आणि वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी भारतमातेचे पूजन करून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला.
डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव हॉस्पिटलमधील विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिरात सहभागी झालेल्या शहीद जवानांच्या परिवारांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह यांसह आवश्यक त्या विविध आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. गरजेनुसार पुढील वैद्यकीय उपचार व मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या परिवारांची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. त्यांच्या आरोग्यासाठी ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या सहकार्याने महादेव हॉस्पिटल सदैव तत्पर राहील. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आवश्यक वैद्यकीय सेवा आणि योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
दरम्यान, ना. गिरीष भाऊ महाजन यांनी व्हिडीओ कॉलद्वारे शहीद जवानांच्या परिवारांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास आमदार राजू मामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका उज्वला बेंडाळे, उदय भालेराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आरोग्यदूत पितांबर भावसार यांनी शिबिराचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.
महादेव हॉस्पिटलचे एन. जी. चौधरी, विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सैनिक सेलचे पदाधिकारी तसेच शहीद जवानांचे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत