Contact Banner

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक : श्रीकांत धिवरे

 

mission-rise-x-youth-participation-essential-srikanth-dhivare-dr-ulhas-patil-medical-college-drug-free-pledge

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक : श्रीकांत धिवरे

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नशामुक्तीची शपथ; विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश

जळगाव : सध्याची अंमली पदार्थांच्या व्यसनाची परिस्थिती अत्यंत भयावह होत चालली आहे. गतवर्षी पोलिसांनी सुमारे ६ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले, तर यंदा आतापर्यंत ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. विशेषतः १७ ते ३० वयोगटातील तरुण व्यसनांकडे वळण्याचे प्रमाण अधिक असून, व्यसनाचा हा प्रवास आता सिंथेटिक अमली पदार्थांकडे वळत आहे. त्यामुळे पोलीस विभागाने हाती घेतलेल्या **‘मिशन राइज एक्स’**च्या यशासाठी युवकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा पोलीस दल आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी (१६ ऑगस्ट) ‘मिशन राइज एक्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक केदार बारबले, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी श्री. दरेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, एपीआय योगिता नारखेडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयालयाचे विभागप्रमुख डॉ. वैभव पाटील, युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया तसेच ज्युनियर मकरंद अनासपुरे आदी उपस्थित होते.






कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ‘मिशन राइज’च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील उत्कर्ष भोसले, प्राची मुरळे, कौस्तुभ वडगावकर, ओम चौधरी आणि पायल यांची मिशन राइजसाठी निवड करण्यात आली.

मानसोपचार तज्ज्ञांचे व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हुमेद महाडिक यांनी व्यसनांची विविध कारणे, त्याचे शरीरावर होणारे विपरीत परिणाम तसेच व्यसनापासून दूर राहण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत चलचित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यसनांना ठामपणे ‘नाही’ म्हणण्याची हिंमत ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.

कायद्याचीही विद्यार्थ्यांना माहिती

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी अंमली पदार्थांचे सेवन व त्यासंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये कायद्यानुसार होणाऱ्या शिक्षांची माहिती चलचित्रफितीद्वारे दिली. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवरांना नशामुक्तीची शपथ दिली.

‘व्यसनांना नाही म्हणणे हाच योग्य मार्ग’

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके म्हणाले की, व्यसनांना ‘नाही’ म्हणणे हाच योग्य मार्ग आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थी हे समाजासाठी रोल मॉडेल आहेत. त्यामुळे त्यांनी नशामुक्तीच्या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. गोदावरी हेल्थ सिटीचा परिसर नशामुक्त असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले.

मिमिक्रीतून नशामुक्तीचा संदेश

कार्यक्रमात ज्युनियर मकरंद अनासपुरे यांनी विविध राजकारणी व अभिनेत्यांची मिमिक्री सादर करत विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित माळी यांनी केले, तर आभार डीवायएसपी केदार बारबले यांनी मानले.

प्राचार्य, प्राध्यापकांची उपस्थिती

कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. हर्षल बोरोले, होमिओपॅथी महाविद्यालयाचे डॉ. विद्यानंद आठवले यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.