तांत्रिक पदवीधारकांसाठी पेटंट क्षेत्रात यशस्वी करिअरची सुसंधी : गौरव जैन
तांत्रिक पदवीधारकांसाठी पेटंट क्षेत्रात यशस्वी करिअरची सुसंधी : गौरव जैन
लेवाजगत न्यूज फैजपूर : संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जग झपाट्याने प्रगती करीत असताना भारतातील तरुण, विशेषतः तांत्रिक पदवीधरांसाठी पेटंट क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातून पैसा, पद, प्रतिष्ठा मिळण्यासोबतच जगभरातील संशोधकांशी संपर्क व नेटवर्किंग करण्याची संधी मिळते. त्यामुळे तरुणांनी पेटंट क्षेत्रातील या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन हेस्टिंग रिसर्चचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी एक्सपर्ट गौरव जैन यांनी केले.
तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे आयोजित विद्यापीठस्तरीय एकदिवसीय ऑनलाइन परिसंवादात ते बोलत होते. ‘नाविन्यता आणि संधींचा मेळ : तांत्रिक पदवीधरांसाठी पेटंट क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे होते. यावेळी वेदांत पुजारी, संजय बाफना यांच्यासह विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील विविध विद्याशाखांचे पदवीधर, संशोधक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित होते.
आधुनिक काळात मानवी बुद्धिमत्ता, कल्पकता आणि नवसंशोधनातून निर्माण होणारी अमूर्त संपत्ती म्हणजे बौद्धिक संपदा होय. या बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी पेटंट हा महत्त्वाचा कायदेशीर अधिकार आहे. याबाबत पदवीधर, संशोधक तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, तसेच पेटंट क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
परिसंवादाचे प्रास्ताविक व समन्वयक प्रा. डॉ. हरीश तळेले यांनी केले. सद्यस्थितीत बौद्धिक संपदा व पेटंट या विषयाबाबत पदवीधरांमध्ये असलेली अनास्था दूर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तांत्रिक पदवीधरांसोबतच या क्षेत्रात रुची असणाऱ्या इतरांनीही पेटंट क्षेत्रातील करिअरच्या संधींचा शोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गौरव जैन यांनी पेटंटसंबंधी मूलभूत माहिती देताना या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी अनेक उदाहरणांसह स्पष्ट केल्या. जगभरातील संशोधकांशी नेटवर्किंग करण्याबरोबरच स्वतःच्या बुद्धिमत्ता, कल्पकता आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून स्वतःच्या नावावर पेटंट नोंदणी करण्याची प्रक्रिया त्यांनी दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे समजावून सांगितली. तसेच पेटंट क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि कौशल्ये याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली.
विनोद पुजारी यांनी आपल्या समृद्ध अनुभवातून पेटंट क्षेत्रातील संधींवर प्रकाश टाकला. या क्षेत्रात पद, पैसा आणि प्रतिष्ठेसोबतच अनुभवसंपन्नता व जागतिक पातळीवर नेटवर्किंग करण्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी बौद्धिक संपदा आणि पेटंट हे आधुनिक काळातील अत्यंत महत्त्वाचे विषय असल्याचे सांगितले. अशा प्रकारचा विद्यापीठस्तरीय परिसंवाद आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून तरुणांनी, विशेषतः तांत्रिक पदवीधारकांनी, पेटंट क्षेत्रातील करिअरच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
परिसंवादाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. हरीश तळेले यांनी केले. परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री. शिरीषदादा चौधरी तसेच सर्व सन्माननीय संचालकांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत