शालेय साहित्यापासून साकारला भगवान श्रीहरींचा भव्य हिंडोळा; सावदा स्वामिनारायण मंदिरात ११२ वर्षांची हिंडोळा महोत्सवाची परंपरा
शालेय साहित्यापासून साकारला भगवान श्रीहरींचा भव्य हिंडोळा; सावदा स्वामिनारायण मंदिरात ११२ वर्षांची हिंडोळा महोत्सवाची परंपरा
सावदा प्रतिनिधी : वडताल धाम, गुजरात यांच्या परंपरेशी संबंधित असलेल्या सावदा येथील श्री स्वामिनारायण मंदिरात गेल्या ११२ वर्षांपासून भव्य हिंडोळा महोत्सवाची परंपरा अखंड सुरू आहे. यंदाच्या हिंडोळा महोत्सवात विविध वस्तूंचा कल्पकतेने वापर करून भगवान श्रीहरींसाठी आकर्षक हिंडोळे साकारण्यात येत असून, शालेय साहित्यापासून तयार करण्यात आलेला सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण हिंडोळा भाविकांचे विशेष आकर्षण ठरला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून मंदिरात सुरू असलेल्या या हिंडोळा महोत्सवात दररोज विविध संकल्पना आणि साहित्याचा वापर करून भगवान श्रीहरींची आकर्षक सजावट करण्यात येत आहे. यामध्ये पेन्सिल, पेन, खोडरबर, कंपास बॉक्स, ड्रॉइंगचे साहित्य, विविध प्रकारचे बॉक्स आदी शालेय साहित्याचा कलात्मक वापर करण्यात आला. विविध शालेय वस्तूंच्या भेंडोळ्यांनी सजविलेला हा भव्य हिंडोळा आणि त्यामध्ये विराजमान भगवान श्रीहरींचे मनोहारी रूप भाविकांसाठी भक्तीबरोबरच आकर्षणाचे केंद्र ठरले.
या सुंदर हिंडोळ्याच्या सेवेसाठी यजमानश्री श्री. विलास यशवंतराव पाटील, सावदा, श्री. प्रदीप निंबा बेंडाळे, न्हावी आणि चि. नीरज युवराज भारंबे, पुणे यांनी सेवा अर्पण केली. त्यांच्या सेवेतून शालेय साहित्याला धार्मिक आणि कलात्मक स्वरूप देत भगवान श्रीहरींसाठी हा अनोखा हिंडोळा साकारण्यात आला.
सावदा येथील श्री स्वामिनारायण मंदिराची ही हिंडोळा महोत्सवाची परंपरा तब्बल ११२ वर्षांची असून, पिढ्यान्पिढ्या भक्तिभावाने ही परंपरा जपली जात आहे. हिंडोळा महोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात दररोज विविध प्रकारच्या सजावटी करण्यात येतात. त्यामुळे या काळात मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जातो.
दरम्यान, श्रावण महिन्याचे औचित्य साधून १३ ऑगस्टपासून मंदिरात श्री हनुमान चालीसा कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत ही कथा होणार असून, शास्त्री स्वामी भक्तीप्रिया दासजी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. श्रावण महिन्यातील या विशेष धार्मिक उपक्रमामुळे भाविकांना हनुमान चालीसेचे महत्त्व, भक्ती आणि अध्यात्मिक विचारांचा लाभ मिळणार आहे.
एकीकडे ११२ वर्षांची अखंड हिंडोळा महोत्सवाची परंपरा आणि दुसरीकडे श्रावण महिन्यानिमित्त सुरू झालेली श्री हनुमान चालीसा कथा यामुळे सावदा येथील श्री स्वामिनारायण मंदिरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. शालेय साहित्यापासून साकारलेला भगवान श्रीहरींचा अनोखा हिंडोळा हा यंदाच्या महोत्सवातील विशेष आकर्षण ठरला असून, भाविकांकडून त्याचे कौतुक होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत