Contact Banner

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर धनगरवाड्याचा ‘पांडुरंग’ बनला ‘असिस्टंट कमांडंट’; सिद्धाई दीप कोचिंग इन्स्टिट्यूटतर्फे गौरव

 

pandurang-phonde-kasarwada-upsc-capf-assistant-commandant-air-252

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर धनगरवाड्याचा ‘पांडुरंग’ बनला ‘असिस्टंट कमांडंट’; सिद्धाई दीप कोचिंग इन्स्टिट्यूटतर्फे गौरव





कोल्हापूर : “स्वप्नं ती नसतात जी झोपल्यावर पडतात, तर स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत,” डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या या विचारांना कोल्हापूर जिल्ह्यातील एका सुपुत्राने आपल्या कर्तृत्वातून सत्यात उतरवले आहे. राधानगरी तालुक्यातील कासारवाडा या दुर्गम व डोंगराळ भागातील रहिवासी पांडुरंग बाबूराव फोंडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC CAPF परीक्षेत यश संपादन करत असिस्टंट कमांडंट पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सिद्धाई दीप कोचिंग इन्स्टिट्यूटतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

पांडुरंग फोंडे यांचा यशाचा प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. गरीब शेतकरी व कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या पांडुरंग यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण केले. राधानगरीच्या डोंगराळ भागातून सुरू झालेला त्यांचा प्रवास थेट दिल्लीतील UPSC परीक्षेपर्यंत पोहोचला. त्यांनी देशात २५२ वा क्रमांक (AIR 252) मिळवत ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. आता ते केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) क्लास वन अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.

या यशामागे तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर येथील विद्याप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच महाज्योती (MAHAJYOTI) यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

विशेष म्हणजे पांडुरंग फोंडे हे सिद्धाई दीप कोचिंग इन्स्टिट्यूटचे खोत सरांचे माजी विद्यार्थी आहेत. आपल्या विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशपातळीवरील स्पर्धा परीक्षेत यश मिळवत असिस्टंट कमांडंट पदापर्यंत मजल मारल्याचा संस्थेच्या परिवाराला विशेष अभिमान आहे.

यावेळी संस्थापक व विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी पांडुरंग यांच्या यशाचे कौतुक करताना सांगितले, “परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय निश्चित असेल, मेहनतीची तयारी असेल आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थीही देशाच्या सर्वोच्च स्तरावर झेप घेऊ शकतो.”

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक खोत यांनीही पांडुरंग यांच्या मेहनतीचे कौतुक केले. “अशाच प्रकारची मेहनत ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याने घेतल्यास यश नक्कीच मिळते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फीया बागवान, संचालिका रेश्मा कातकर, हिंदवी चौगले यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.