Contact Banner

उपजत बुद्धिमत्तेचा सदुपयोग हाच कृत्रिम बुद्धिमत्तेवर सकारात्मक अंकुश-प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे

 

upajat-buddhimattecha-sadupayog-hach-krutrim-buddhimattevar-sakaratmak-ankush-principal-dr-rajendra-waghulde

उपजत बुद्धिमत्तेचा सदुपयोग हाच कृत्रिम बुद्धिमत्तेवर सकारात्मक अंकुश-प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे

प्रतिनिधी फैजपूर -

२१व्या शतकातील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) असून, एआयने मानवी जीवनातील जवळपास सर्वच क्षेत्रांवर प्रभाव निर्माण केला आहे. अबालवृद्ध कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नकारात्मक वापराच्या आहारी जात असताना, निसर्गदत्त मिळालेली उपजत बुद्धिमत्ता अधिकाधिक तीक्ष्ण करून तिचा सकारात्मक वापर करणे हाच कृत्रिम बुद्धिमत्तेवर प्रभावी अंकुश ठरू शकतो, असे मत धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी व्यक्त केले.






स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माननीय लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. वाय. चौधरी, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. एल. चौधरी, माजी प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्यासह तीनही शाखांचे उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी ‘जेन झी’, ‘जेन अल्फा’ पिढीसमोरील आव्हाने, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता अतिरेक अशा विविध ज्वलंत विषयांवर भाष्य केले.

भारताला परकीयांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले असले तरी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणे हेच खरे स्वातंत्र्य असल्याचे त्यांनी सांगितले. जीवनाचा पुरेपूर आनंद घेताना आपल्या वर्तनामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. आपण ज्या परिसरात राहतो तो तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून समाजाला अधिक सक्षम करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे केली. तसेच देशभक्तीपर गीते आणि नृत्य सादर करून स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उत्साहात साजरा केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.