Contact Banner

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती : डॉ. उल्हास पाटील

 

parishadetil-vaktyanni-dilele-dnyan-vidyarthyansathi-sampatti-dr-ulhas-patil

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती : डॉ. उल्हास पाटील

लेवाजगत न्यूज जळगाव : वृद्ध वैद्यकशास्त्राचा अभ्यास करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. परिषदेसाठी उपस्थित वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ वक्त्यांकडून मिळणारे ज्ञान हे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संपत्ती आहे, असे प्रतिपादन गोदावरी हेल्थ सिटीचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी केले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनरल मेडिसिन विभागातर्फे ‘वृद्ध वैद्यकशास्त्र : प्रतिबंधापासून उपशामक उपचारापर्यंत’ या विषयावर एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. उल्हास पाटील मार्गदर्शन करत होते.

परिषदेच्या प्रारंभी चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. अनिता बसवराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच स्व. गोदावरी पाटील व धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. सी. डी. सारंग, सचिव डॉ. युवराज बढे, डॉ. प्रमोद उमर्जी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, या परिषदेसाठी सुमारे ५०० प्रतिनिधींची नोंदणी झाली असून, हे परिषदेचे यश आहे. परिषदेसाठी उपस्थित तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात ज्ञान आत्मसात करावे. वृद्ध वैद्यकशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास करावा. यावेळी त्यांनी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच्या आठवणींना उजाळा देत प्रा. डॉ. डी. के. मित्रा यांचा विशेष उल्लेख केला.

परिषदेत तज्ज्ञांनी विविध विषयांवर केलेल्या मार्गदर्शनाच्या लेखी नोंदी विद्यार्थ्यांनी करून घ्याव्यात, असे आवाहनही डॉ. उल्हास पाटील यांनी केले.

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक सेकंदाला नवनवीन बदल होत आहेत. या बदलांबाबत विद्यार्थ्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे परिषद, कार्यशाळा, प्रश्नमंजुषा आदी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच राज्यस्तरीय स्पर्धाही महाविद्यालयामार्फत आयोजित केल्या जातात. जनरल मेडिसिन विभागाने आयोजित केलेल्या या परिषदेचे त्यांनी कौतुक केले.

परिषदेचे प्रास्ताविक आयोजन समितीचे चेअरमन डॉ. सी. डी. सारंग यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. स्वानंद झंवर, डॉ. सृष्टी सोनपसारे आणि डॉ. खुशी सुराणा यांनी केले. परिषदेच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे डॉ. तन्मय मेहता यांनी परिश्रम घेतले.






या तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

परिषदेत डॉ. सी. ए. कांते, डॉ. पल्लवी बढे, डॉ. अभय जोशी, डॉ. विजया दाते, डॉ. अनिता बसवराज, डॉ. अपर्णा साधळे, डॉ. अंजली शेटे, डॉ. प्रमोद उमर्जी, डॉ. भूषण चोपडे, डॉ. चिमू चिंते, डॉ. गुणवंत महाजन, डॉ. सी. डी. सारंग, डॉ. युवराज बढे आणि डॉ. रोशन राजपूत या तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.