सावद्यात अमली पदार्थविरोधी ‘मिशन RISE’ अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम
सावद्यात अमली पदार्थविरोधी ‘मिशन RISE’ अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम
पोलिसांच्या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; व्यसनमुक्त समाजासाठी सामूहिक लढ्याचे आवाहन
लेवाजगत न्यूज सावदा : जळगाव जिल्हा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी धडक मोहिमेअंतर्गत ‘मिशन RISE’ कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (७ ऑगस्ट) सायंकाळी ५.३० ते ७.३० वाजेदरम्यान सावदा शहरातील जेहरा मॅरेज हॉल येथे करण्यात आले. सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. चेतना व्यसनमुक्ती केंद्र, जळगावचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांना प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी जळगाव जिल्हा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी धडक मोहिमेबाबत तसेच अमली पदार्थांविरोधातील सामूहिक लढ्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच युवकांना व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज याबाबत डॉ. नितीन विसपुते यांनी मार्गदर्शन केले.
अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे युवकांचे भविष्य धोक्यात येत असून, व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नसून पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनीही सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक आहे, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. ‘व्यसनमुक्त आणि सुरक्षित समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे,’ असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास जेहरा हॉलचे संचालक शब्बीर हुसेन हाजी अख्तर अली ऊर्फ बाबू शेठ, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, नगरसेवक विशाल तायडे, चिनावल येथील इरफान मेंबर, गजानन ठोसरे, पत्रकार अजहर खान, सूत्रसंचालक संजय महाजन सर, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप यांच्यासह सावदा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच सावदा नगरपरिषदेचे विद्यमान व माजी नगरसेवक, हद्दीतील पोलीस पाटील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी कार्यक्रमाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अमली पदार्थांविरोधातील जनजागृती मोहिमेला सामाजिक पाठबळ मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
अमली पदार्थांविरोधात जनजागृती वाढवून युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांसोबत नागरिकांनीही एकजुटीने पुढाकार घ्यावा. तसेच व्यसनाधीन व्यक्तींना तिरस्कार न करता त्यांना व्यसनमुक्तीच्या मार्गावर आणण्यासाठी समाजाने सहकार्य करावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत