Contact Banner

खड्ड्यामुळे रिक्षा अनियंत्रित; अपघातात शास्त्री गोविंदराज राजधरबाबांचा मृत्यू सांगवी-फैजपूर रस्त्यावर रिक्षा बैलगाडीवर आदळली; १८ रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

 

rikscha-accident-sangvi-faizpur-shastri-govindraaj-rajdhar-baba-death

खड्ड्यामुळे रिक्षा अनियंत्रित; अपघातात शास्त्री गोविंदराज राजधरबाबांचा मृत्यू

सांगवी-फैजपूर रस्त्यावर रिक्षा बैलगाडीवर आदळली; १८ रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी फैजपूर-

सांगवी बुद्रुक (ता. यावल) येथील महानुभाव पंथाचे शास्त्री गोविंदराज राजधरबाबा (वय ६१) यांचा सांगवी-फैजपूर रस्त्यावर झालेल्या रिक्षा अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्ड्यात रिक्षाचे चाक गेल्याने रिक्षा अनियंत्रित होऊन बाजूला उभ्या असलेल्या बैलगाडीला धडकली. या अपघातात रिक्षातील लोखंडी पाइप पोटात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

शास्त्री गोविंदराज राजधरबाबा हे सोमवारी रिक्षाने फैजपूरमार्गे चांगदेवकडे जात होते. सांगवी-फैजपूर रस्त्यावरील पेट्रोलपंपावर रिक्षाचालक अमोल मिस्तरी याने पेट्रोल भरले. त्यानंतर फैजपूरच्या दिशेने जात असताना पंपासमोरील चिंचेच्या झाडाजवळ रिक्षाचे चाक खड्ड्यात गेले. त्यामुळे रिक्षा अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलगाडीवर आदळली.

अपघातात लोखंडी पाइप शास्त्रीजींच्या पोटात घुसला. त्यांनी तो पाइप स्वतःच बाहेर काढल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना फैजपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी करून डॉ. चंद्रसेन चौगुले यांनी त्यांना मृत घोषित केले.

पाइप न काढता तातडीने उपचार मिळाले असते तर...





अपघातानंतर पोटात घुसलेला लोखंडी पाइप बाहेर काढल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. पाइप तसाच ठेवून तातडीने रुग्णालयात नेले असते, तर शस्त्रक्रिया करून त्यांचा जीव वाचवणे शक्य झाले असते, अशी माहिती डॉ. शैलेंद्र खाचणे यांनी दिली.

या प्रकरणी गोपाल शास्त्री यांच्या खबरीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.

दरम्यान, शास्त्री गोविंदराज राजधरबाबा यांच्यावर १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सांगवी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने महानुभाव पंथीय समाजासह सांगवी परिसरात शोककळा पसरली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.