Contact Banner

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात

 

rotaract-club-godavari-elite-navparva-installation-ceremony-2026-27-jalgaon

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात

जळगाव : रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटच्या वर्ष २०२६-२७ च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात रोटारॅक्टर मिथिलेश खैरनार यांनी अध्यक्षपदाची, तर रोटारॅक्टर जान्हवी सोनवणे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात संचालक रो. डॉ. प्रशांत वारके यांनी २०१० पासून क्लबच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. गेल्या १६-१७ वर्षांपासून क्लब सातत्याने कार्यरत असून जिल्ह्यातील सर्वोत्तम क्लब म्हणून त्याने नावलौकिक मिळविला असल्याचे त्यांनी सांगितले.

मार्टिन ल्युथर किंग यांच्या ‘तुम्ही जगासाठी काय करता, हेच जगातील सर्वात महत्त्वाचे काम आहे’ या विचारांचा दाखला देत डॉ. वारके यांनी तरुण रोटारॅक्टर्सना समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरित केले. तसेच नवनिर्वाचित कार्यकारिणीला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





यानंतर मान्यवरांच्या हस्ते कॉलरिंग व पदग्रहण विधी पार पडला. अध्यक्ष मिथिलेश खैरनार आणि सचिव जान्हवी सोनवणे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.

यावेळी क्लबचे चेअरमन रो. अजित महाजन, एडीआरआर रो. वैभव आबोटी, रोटरी व रोटारॅक्ट क्लबचे अध्यक्ष, सचिव, प्राध्यापक वर्ग तसेच मोठ्या संख्येने रोटारॅक्ट सदस्य उपस्थित होते.

रो. राजीव बियाणी यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा देताना, रोटारॅक्ट हे युवकांना नेतृत्वगुण व कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. या माध्यमातून मिळणारा अनुभव भविष्यात नक्कीच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवीन संकल्प अन् सामाजिक बांधिलकी

नवनिर्वाचित अध्यक्ष मिथिलेश खैरनार यांनी मनोगतातून आगामी वर्षात युवक सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांवर भर देण्याचा संकल्प व्यक्त केला. ‘नवपर्व’च्या माध्यमातून क्लबला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोट्रॅक्टर तेजस्विनी गायकवाड यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. पदग्रहण सोहळ्यामुळे क्लबच्या नवोदित सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.