सावदा पोलिसांची धडक कारवाई; गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणारे दोघे गजाआड
सावदा पोलिसांची धडक कारवाई; गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणारे दोघे गजाआड
छोटा हत्ती वाहनासह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोन गोवंशांची सुटका
सावदा (जळगाव) : गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर व निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या वाहनावर सावदा पोलिसांनी रविवारी रात्री धडक कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पिवळ्या रंगाच्या टाटा एस (छोटा हत्ती) वाहनासह एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनातून दोन गोवंशांची सुटका करून त्यांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत रवाना करण्यात आले.
सावदा पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहसीन रहेमानखा पठाण व पोहेकॉ निलेश बाविस्कर हे २२ ऑगस्ट रोजी रात्री पोलीस ठाण्यात हजर असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सावदा शहरातील ख्वाजा नगरसमोरील मरीमाता मंदिराजवळून गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतूक करणारे वाहन जाणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री सुमारे ८.५० वाजता मरीमाता मंदिराजवळ सापळा रचला. यावेळी ख्वाजा नगरकडून येणारे पिवळ्या रंगाचे टाटा एस वाहन क्रमांक MH 48 AG 5804 संशयास्पदरीत्या येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनाच्या मागील बॉडीमध्ये दोन गोवंश अत्यंत निर्दयपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. जनावरांना हालचाल करण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलिसांनी अदनान शेख शगीर कुरैशी (वय १९, रा. इस्लामपुरा, खाटकीवाडा, सावदा, ता. रावेर) याच्यासह निलेश रमेश पाटील (वय ४४, रा. प्लॉट भाग, टेलिफोन एक्स्चेंजजवळ, सावदा) यांना ताब्यात घेतले.
३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे १५ हजार रुपये किमतीची तांबड्या रंगाची आठ वर्षांची गाय, सुमारे १५ हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा पाच वर्षांचा गोन्हा आणि सुमारे ३ लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहन असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींकडे जनावरांच्या खरेदी-विक्री अथवा वाहतुकीसंदर्भातील कोणतेही वैध कागदपत्र किंवा परवाना आढळून आला नाही. पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून दोन्ही जनावरांची तपासणी करून घेतली. त्यानंतर दोन्ही गोवंशांची सुटका करून त्यांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत पाठवण्यात आले.
विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०२१९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारणा २०१५) चे कलम ५(अ), ९; प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(d), ११(१)(g); महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ चे कलम ८३, १७७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोहेकॉ मोहसीन पठाण, निलेश बाविस्कर, पोलीस नाईक जाकीर मन्सूरी, सुनील सैंदाणे यांच्या पथकाने केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक जाकीर मन्सूरी करीत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत