शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत
लेवाजगत न्यूज जळगाव : राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) मधील इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक तसेच अव्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
१२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जासाठी ७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्राप्त अर्जांची छाननी १ ते ७ सप्टेंबर २०२६ दरम्यान होणार असून, ८ सप्टेंबर रोजी पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी १८ सप्टेंबर २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर प्रथम रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर ‘इतर मागास बहुजन कल्याण विभाग’ हा पर्याय निवडून मुलांनी ‘मुलांचे शासकीय वसतिगृह, शिव कॉलनी, जळगाव’, तर मुलींनी ‘मुलींचे शासकीय वसतिगृह, गिरणा पाण्याची टाकी जवळ, लक्ष्मी नगर, जळगाव’ हा पर्याय निवडून प्रवेश अर्ज पूर्ण भरावा.
जळगाव जिल्ह्यातील ओबीसी, VJNT आणि SBC प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत ऑनलाइन प्रवेश अर्ज करावेत. अर्ज भरताना किंवा प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही अडचण आल्यास सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक विशाल पं. राठोड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत