Contact Banner

“शेवभाजीचं पार्सल आणतोय, पोळ्या तयार ठेव…” आईशी शेवटचा संवाद; वाढदिवशीच मुलाचा मृत्यू

 

shirpur-bus-accident-two-friends-died-on-birthday-shevbhaji-last-call-to-mother

“शेवभाजीचं पार्सल आणतोय, पोळ्या तयार ठेव…” आईशी शेवटचा संवाद; वाढदिवशीच मुलाचा मृत्यू

शिरपूरजवळ भरधाव बसने दुचाकीला चिरडले; दोघा जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत; मित्रासाठी १५ किमी अनवाणी चालत आला सागर

प्रतिनिधी । शिरपूर

“आई, मी केक आणि शेवभाजीचं पार्सल घेऊन येतोय. तू फक्त पोळ्या करून ठेव…” वाढदिवसानिमित्त मित्रांसोबत आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या चेतन गुजरचा आईशी झालेला हा शेवटचा संवाद ठरला. काही वेळातच काळाने त्याच्यावर घाला घातला. शिरपूर-चोपडा रस्त्यावर भरधाव एसटी बसने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत चेतनसह त्याचा जिवलग मित्र कल्पेश पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने भाटपुरासह परिसरावर शोककळा पसरली आहे.






ही हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. ५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शिरपूर-चोपडा रस्त्यावरील प्रणव टेक्सटाइलसमोर घडली. चेतन योगराज गुजर (वय १९) आणि कल्पेश नितीन पाटील (वय २०, दोघेही रा. भाटपुरा) अशी मृत मित्रांची नावे आहेत. दोघेही जिवलग मित्र होते.

चेतनचा ५ ऑगस्ट रोजी १९वा वाढदिवस होता. नाशिक येथे डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तो नोकरीला रुजू झाला होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी तो भाटपुरा येथे आला होता. मित्रांनी शिरपूर शहरातील तपन पटेल मार्गावर त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून घरी परतत होते.

घरी परतताना चेतनने आईला फोन करून, “केक आणि शेवभाजीचं पार्सल घेऊन येतोय, तू पोळ्या करून ठेव,” असे सांगितले होते. वडिलांनाही लवकर घरी येण्याचे त्याने आश्वासन दिले होते. मात्र, घरी परतण्यापूर्वीच काळाने त्याला हिरावून नेले.

रात्री साडेनऊच्या सुमारास प्रणव टेक्सटाइलजवळ एमएच १४ बीटी २३४९ क्रमांकाच्या भरधाव बसने त्यांच्या एमएच १८ बीपी ११५५ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ओव्हरटेक करताना बसचालकाचा दुचाकीला धक्का लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही मृत्यू झाला.

कल्पेश होता कुटुंबाचा एकमेव आधार

कल्पेशने पुणे येथे बीसीएचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याला नोकरीचे ऑफर लेटरही मिळाले होते. मात्र, वडिलांचे यापूर्वीच निधन झाल्याने तो कुटुंबाचा एकमेव आधार होता. वाढदिवसाच्या निमित्ताने चेतनसोबत तोही भाटपुरा येथे आला होता. दोन्ही तरुणांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मित्रांचा संताप; शिरपूर-चोपडा महामार्ग रोखला

अपघाताची माहिती मिळताच भाटपुरासह दहिवद, भोरखेडा, असली आणि अहिल्यापूर परिसरातील शेकडो तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या जिवलग मित्रांचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह पाहून तरुणांचा संताप अनावर झाला.

दरम्यान, बसचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे समोर आले. संतप्त जमावाने दोषी एसटी चालकाला हजर केल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नसल्याची भूमिका घेत शिरपूर-चोपडा महामार्ग रोखून धरला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, रात्री सुमारे दोन वाजेपर्यंत महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होती.

“रुग्णवाहिकाही बराच वेळ आली नाही”

अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले भाटपुरा येथील खुशाल बाविस्कर यांनी सांगितले की, “शिरपूर येथील एका मॉलमधील ड्यूटी संपवून घरी जात असताना हा अपघात दिसला. अपघात इतका भीषण होता की काय करावे हेच सुचत नव्हते. एसटी बसचालक खाली उतरून चोपड्याच्या दिशेने पळताना दिसला. वाहक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत होते. स्वतःला सावरत रुग्णवाहिकेला फोन केला; मात्र तीही बराच वेळ आली नाही. त्यानंतर लगेच वडिलांना फोन करून संबंधितांना माहिती देण्यास सांगितले.”

मित्रासाठी १५ किलोमीटर अनवाणी चालला सागर

चेतन, कल्पेश आणि सागर हे जिवलग मैत्रीचे त्रिकूट होते. तिघांची मैत्री इतकी घट्ट होती की एकाच्या सुख-दुःखात दुसरे दोघे नेहमीच सोबत असायचे. मात्र, चेतन आणि कल्पेशच्या अपघाती मृत्यूची बातमी सागरच्या कानावर पडताच त्याला मोठा धक्का बसला.

सागर सध्या पुण्यात नोकरीला आहे. दोन्ही मित्रांच्या अपघाताची माहिती मिळताच तो कोणतीही तयारी न करता, चप्पलही न घालता गावी निघाला. बस मिळावी म्हणून त्याने तब्बल १५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत प्रवास केला. जिवलग मित्रांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्याची सुरू असलेली धडपड पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले.

सागरला आपल्या दोन्ही मित्रांचे अखेरचे दर्शन घेता यावे, यासाठी अंत्यविधी अर्धा तास विलंबाने करण्यात आला. अखेर सागर घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याने आपल्या जिवलग मित्रांचे अंतिम दर्शन घेतले.

अंत्यविधीच्या वेळी तिघांच्या अतूट मैत्रीच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले. मित्रासाठी १५ किलोमीटर अनवाणी चालत आलेल्या सागरचे दुःख पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. मृत्यूने दोन मित्रांना हिरावून नेले; मात्र त्यांच्या मैत्रीचा बंध शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिला.

चेतनच्या वाढदिवशीच त्याचा मृत्यू, आईशी झालेला शेवटचा संवाद आणि मित्रांच्या अंतिम दर्शनासाठी सागरने केलेली धडपड या घटनांनी संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. भाटपुरा गावावर शोककळा पसरली असून, दोन होतकरू तरुणांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.