तीन बैल जोड्या चोरणाऱ्या चौकडीचा पर्दाफाश; तिघांना अटक सावदा पोलिसांची कारवाई; सहा बैलांसह ७ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी फरार
तीन बैल जोड्या चोरणाऱ्या चौकडीचा पर्दाफाश; तिघांना अटक
सावदा पोलिसांची कारवाई; सहा बैलांसह ७ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी फरार
लेवाजगत न्यूज सावदा : सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावखेडा बुद्रुक परिसरातून तीन बैल जोड्या चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा सावदा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेले एकूण सहा बैल तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो मॅक्स पिकअप आणि दुचाकी असा एकूण ७ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
सावखेडा बुद्रुक परिसरातील गोठ्यातून दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अलाउद्दीन नबाब तडवी, गुलशेर बशीर तडवी आणि संजु नबाब तडवी यांच्या मालकीच्या सुमारे ९० हजार रुपये किमतीच्या तीन बैल जोड्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश बाविस्कर यांच्याकडे सोपविण्यात आला. पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये सावखेडा गावात मोटारसायकलवर दोन संशयित व्यक्ती फिरताना दिसून आले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आवेश खान एजाज खान (वय २०, रा. खाजानगर, सावदा) आणि शेख हयात शेख मासुम (वय २५, रा. मन्यारवाडा, चिनावल) यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली देत हा गुन्हा शेख नासीर शेख चाँद कुरेशी (रा. प्रतिभानगर, वरणगाव) आणि शेख राजीक (रा. रसलपूर, ता. रावेर) यांच्या साथीने केल्याची माहिती दिली.
पोलिसांनी आवेश खान आणि शेख हयात यांच्याकडून चोरीस गेलेल्या तीन बैल जोड्या म्हणजेच सहा बैलांचा ताबा मिळवून ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले. तसेच नासीर शेख चाँद कुरेशी याला अटक करून त्याच्याकडून ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप (क्र. MH 19 CX 1667) आणि २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH 19 ES 6611) जप्त करण्यात आली.
या कारवाईत आतापर्यंत एकूण ७ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपी शेख राजीक याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश फड, पोउपनि राहुल सानप, सफौ जयराम खोडपे, पोहेका निलेश बाविस्कर, मेहरबान तडवी, संजीव चौधरी, अतुल तडवी, पोका संजय तडवी आणि चालक नामदेव कापडे यांनी केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत