विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांची विक्री; अमळनेर, जळगावात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांची विक्री; अमळनेर, जळगावात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
दोन्ही ठिकाणांहून १ लाख ६ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त; नागरिकांना खरेदीपूर्वी लेबल तपासण्याचे आवाहन
लेवाजगत न्यूज जळगाव, दि. २६ : जिल्ह्यात विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती व विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने अमळनेर आणि जळगाव शहरात धडक कारवाई केली. या कारवाईत दोन्ही ठिकाणांहून एकूण १ लाख ६ हजार ३२५ रुपये किमतीचा सौंदर्यप्रसाधनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्याचे सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र. भा. अस्वार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने २३ ऑगस्ट २०२६ रोजी अमळनेर येथील रवींद्रनगर परिसरातील श्रीमती प्रियदर्शनी रजाळे यांच्या ठिकाणी, तर २४ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव शहरातील महाबळ परिसरातील श्रीमती राशी तळरेजा यांच्या ठिकाणी पंचांसमक्ष तपासणी व चौकशी केली.
तपासणीदरम्यान अमळनेर येथून ७२ हजार ३९२ रुपये, तर जळगाव येथून ३३ हजार ९३३ रुपये किमतीचा सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये विविध प्रकारचे क्रीम, पावडर, जेल स्वरूपातील उत्पादने, लेबल असलेली तसेच विनालेबल सौंदर्यप्रसाधने यांचा समावेश आहे.
तसेच या ठिकाणी सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनासाठी वापरले जाणारे प्रिंटेड लेबल्स, रिकाम्या बरण्या, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि पॅकिंगसाठी लागणारे साहित्य आढळून आले. संबंधित सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती व साठवणूक करण्यासाठी कोणताही वैध उत्पादन परवाना नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले.
सौंदर्यप्रसाधनांची गुणवत्ता तपासणी न करता त्यांच्यावर लेबल लावून त्यांची साठवणूक व विक्री केली जात असल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले. जप्त केलेल्या मालापैकी काही सौंदर्यप्रसाधनांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ही कारवाई सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र. भा. अस्वार यांच्यासह अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील श्रीमती क. र. पाटील व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाने नाशिक विभागाचे सह-आयुक्त (औषधे) अशोक बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
नागरिकांनी दक्षता घ्यावी
सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना ग्राहकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. कोणतेही सौंदर्यप्रसाधन खरेदी करण्यापूर्वी त्याच्या लेबलवर उत्पादन परवाना क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, समूह/बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख आणि मुदतबाह्यता तारीख यांसारखी आवश्यक माहिती नमूद आहे की नाही, याची खात्री करावी.
विनापरवाना किंवा अपूर्ण माहिती असलेली सौंदर्यप्रसाधने खरेदी न करता अधिकृत व विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच उत्पादने खरेदी करावीत. ग्राहकांनी कोणत्याही संशयास्पद सौंदर्यप्रसाधनांची विक्री आढळल्यास संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहनही डॉ. अस्वार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत