Contact Banner

युवकांनी स्वतःमधील ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करून आदर्श घडवावा : कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत

 

youth-should-use-their-energy-positively-and-set-an-example-captain-dr-rajendra-rajput

युवकांनी स्वतःमधील ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करून आदर्श घडवावा : कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत

फैजपूर : युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा, क्षमता आणि उत्साह असतो. या ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करून युवकांनी समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी तथा इंग्रजी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले.

तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच ग्रामीण रुग्णालय, न्हावी येथील आयसीटीसी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘युवक : देशाचे भवितव्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत बोलत होते.






याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या तथा हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. कल्पना पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सतीश पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. मच्छिंद्र पाटील, महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. सविता वाघमारे तसेच ग्रामीण रुग्णालय, न्हावी येथील आयसीटीसी केंद्राचे समुपदेशक मनोज चव्हाण उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून युवकांमधील बलस्थाने ओळखणे, त्यांच्या सकारात्मक ऊर्जेला योग्य दिशा देणे आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने त्यांना सक्षम बनविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सतीश पाटील यांनी केले. युवकांनी स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाचे, महाविद्यालयाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

मार्गदर्शन करताना कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी संत ज्ञानेश्वर, छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याची उदाहरणे दिली. ज्यांच्या देहात ताकद व सक्रियता, मनात करुणा व सहवेदना, उदात्त हेतू आणि बुद्धीत नाविन्याचा ध्यास आहे, तसेच जे आपल्या अंगभूत क्षमतांचा प्रत्येक क्षणी पुरेपूर उपयोग करून स्वतःचा विकास करतात, असे युवक समाज आणि देशाच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

युवकांनी आपल्या क्षमतांची ओळख करून घेत त्यांचा योग्य व सकारात्मक वापर करावा. वैयक्तिक प्रगतीसोबतच समाज आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देत आदर्श नागरिक म्हणून आपली ओळख निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती महाजन यांनी केले, तर श्वेता भालेराव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.