Contact Banner

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

 

5012-assistant-professor-recruitment-maharashtra

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

लेवाजगत न्यूज जळगाव, दि. ३  : राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील ५,०१२ रिक्त पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पडावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे विविध सूचना जारी केल्या आहेत. याबाबत उच्च शिक्षण जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. पराग मसराम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.






नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर जाहिरातीचा मसुदा संबंधित विद्यापीठाच्या मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे. जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची अचूक माहिती नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध करता येणार असून, राष्ट्रीय व राज्यस्तरीय वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले असून, ऑफलाइन अर्जाचीही तरतूद आहे. उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंगसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेले निकष वापरणे आवश्यक आहे. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची यादी तसेच गुणांकनाचा तपशील संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा लागणार आहे.

मुलाखतीचे संपूर्ण CCTV रेकॉर्डिंग करणे आणि ते किमान एक वर्ष सुरक्षित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवड समितीची रचना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचना व शासन निर्णयानुसार करावी लागणार आहे. विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम निवड यादीही संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक राहणार आहे.

“सहाय्यक प्राध्यापक पदभरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, नियमानुसार आणि उमेदवारांच्या दृष्टीने विश्वासार्ह व्हावी, हा शासनाच्या नव्या सूचनांचा मुख्य उद्देश आहे,” असे सहसंचालक डॉ. पराग मसराम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.