वडताल येथील स्वामिनारायण मंदिरातील पवित्र प्रसाद अन् महालक्ष्मीची साडी भेट कोथळीत हरिनाम सप्ताहाची पसायदानाने झाली सांगता
वडताल येथील स्वामिनारायण मंदिरातील पवित्र प्रसाद अन् महालक्ष्मीची साडी भेट
कोथळीत हरिनाम सप्ताहाची पसायदानाने झाली सांगता
मुक्ताईनगर लेवाजगत न्यूज शहर प्रतिनिधी-
राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त (अमृत महोत्सव) श्रीक्षेत्र कोथळी येथील पावन श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या ‘अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्या’ची मंगळवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
सांगता सोहळ्यातील अत्यंत भावूक आणि महत्त्वपूर्ण क्षण म्हणजे गुजरातमधील श्रीक्षेत्र वडताल येथील स्वामिनारायण संप्रदायाच्या मंदिरातून श्री लक्ष्मी मातेला अर्पण करण्यात आलेली पवित्र साडी प्रसादरूपाने कोथळी येथे आणण्यात आली. पी. पी. स्वामी यांनी आणलेली ही विशेष साडी सतपंथ आचार्य महामंडलेश्वर पूज्य जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना सुपूर्द करण्यात आली.
कथेच्या अंतिम चरणात उपस्थित संत-महंतांच्या हस्ते आमदार एकनाथराव खडसे यांच्या दीर्घायुष्यासाठी अभीष्टचिंतन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक पसायदानाने सात दिवसीय धार्मिक सोहळ्याची सांगता करण्यात आली. या महोत्सवात जळगाव जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक व वारकरी सहभागी झाले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
संत मुक्ताई चरित्राची सांगता
ज्ञानयज्ञाच्या अखेरच्या दिवशी ह. भ. प. विशालजी महाराज खोले यांनी आदिशक्ती संत मुक्ताई आणि वारकरी संप्रदायाच्या जीवनप्रवासाचा सुंदर आढावा घेतला. विठ्ठलपंतांच्या जन्मापासून ते संत मुक्ताईंच्या अंतर्धान समाधीपर्यंतच्या विविध प्रसंगांवर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
संत-महात्म्यांची मांदियाळी
पूर्णाहुती सोहळ्याला राज्यभरातून आलेल्या नामवंत संत-महात्म्यांचे सानिध्य लाभले. सतपंथ आचार्य प. पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी ह. भ. प. कन्हैया महाराज, सुखदेव महाराज, ह. भ. प. विशाल महाराज खोले, ह. भ. प. खगेन्द्रजी महाराज (शहादेकर), संत गोपाल चैतन्यजी महाराज (पाल), प्रसाद महाराज यांच्यासह अनेक वारकरी व संतश्रेष्ठांची उपस्थिती होती.
सात दिवस चाललेल्या या भक्तिमय सोहळ्याच्या यशस्वितेसाठी तालुक्यातील वारकरी, भजनी मंडळे आणि भाविकांनी सहकार्य केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत