अत्याचाराची फिर्याद देणारी तरुणी तीन महिन्यांनी आरोपी तरुणाच्या घरी पोलिसांसमोर स्वखुशीने त्याच्यासोबत राहण्याचा लेखी जबाब
अत्याचाराची फिर्याद देणारी तरुणी तीन महिन्यांनी आरोपी तरुणाच्या घरी
पोलिसांसमोर स्वखुशीने त्याच्यासोबत राहण्याचा लेखी जबाब
लेवाजगत न्यूज रावेर : गुंगीचे औषध पाजून अपहरण, बेशुद्धावस्थेत आळंदी येथे विवाह आणि पुण्यात अत्याचार केल्याचा आरोप करत एका तरुणासह त्याच्या कुटुंबातील दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करणारी तरुणी तीन महिन्यांनंतर सोमवारी संबंधित तरुणाच्या घरी पोहोचली. तिने पोलिसांसमोर आपण सज्ञान असून, स्वखुशीने संबंधित तरुणासोबत राहणार असल्याचा लेखी जबाब दिल्याने या प्रकरणाची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.
कुटुंबातील दहा जणांविरोधात गुन्हा
तालुक्यातील एका गावातील तरुणासह त्याचे भाऊ, चुलतभाऊ, वहिनी, वडील, काका व मावसभाऊ अशा दहा जणांविरुद्ध तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. १ सप्टेंबर रोजी ती संबंधित तरुणाच्या घरी आल्याची माहिती त्याच्या वडिलांनी रावेर पोलिसांना दिली.
पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह पथकाने तरुणीला पोलिस ठाण्यात आणले. दोन्ही कुटुंबीयांना बोलावून तिचा जबाब नोंदविण्यात आला. आपण सज्ञान असून, स्वतःच्या इच्छेने संबंधित तरुणासोबत राहणार असल्याचे तिने पोलिसांना लेखी स्वरूपात सांगितले. तसेच आई-वडिलांशी चर्चा करण्यासही तिने नकार दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी दाखल केलेल्या फिर्यादीत तरुणीने हतनूर पुलाजवळून अपहरण करून गुंगीचे औषध पाजल्याचा, आळंदी येथे बेशुद्धावस्थेत विवाह लावल्याचा आणि पुण्यात अत्याचार केल्याचा आरोप केला होता. आता तिच्या नव्या भूमिकेमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या दोन्ही भूमिकांमागील नेमके सत्य काय, हे पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत