Contact Banner

अभ्युदय नगरच्या राजाचा ७०वा गणेशोत्सव; भक्तीसोबत सामाजिक कार्याचा जागर

 

abhyuday-nagar-cha-raja-70va-ganeshotsav-bhaktisobat-samajik-karyacha-jagar

अभ्युदय नगरच्या राजाचा ७०वा गणेशोत्सव; भक्तीसोबत सामाजिक कार्याचा जागर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : काळाचौकी येथील अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा ‘अभ्युदय नगरचा राजा’ या गणेशमूर्तीचा ७०वा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मंडळाच्या प्रदीर्घ परंपरेला साजेशा पद्धतीने यंदाच्या उत्सवाचे नियोजन करण्यात आले असून, भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, आकर्षक विद्युत रोषणाई आणि सामाजिक संदेश देणारे देखावे हे यंदाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. उत्सवाच्या काळात रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, अन्नदान तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

दहा दिवसांच्या या उत्सवात भजन, कीर्तन, बालकांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना सुरक्षित व सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी मंडळाचे स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत.

‘हार-फुलांऐवजी वह्या-पुस्तके द्या’

गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही भाविकांनी गणरायाच्या चरणी हार-फुले अर्पण करण्याऐवजी वह्या, पुस्तके, पेन आणि पेन्सिली आणाव्यात, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. संकलित शैक्षणिक साहित्य गरजू तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजासाठी काहीतरी देण्याची संधी ठरावी, या उद्देशाने मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थना मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.