Contact Banner

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ. अमोल जावळे आक्रमक; जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

 

amol-jawale-farmers-issues-jalgaon-drought-declaration-demand

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ. अमोल जावळे आक्रमक; जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

amol-jawale-farmers-issues-jalgaon-drought-declaration-demand
 लेवा जगत मार्फत जाहिरात प्रसिद्ध 


नाशिक | प्रतिनिधी : नाशिक येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली. पीक विमा, कृषी पंपांचा वीजपुरवठा, वीज बिलमाफी, पीक नुकसान आणि दुष्काळी परिस्थितीबाबत त्यांनी शासनाकडे विविध मागण्या केल्या.

केळी पीक विम्यातील तफावत दूर करण्याची मागणी

सन २०२५-२६ मधील केळी पीक विमा भरपाईतील तफावत दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात योग्य व न्याय्य भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार जावळे यांनी केली.

कृषी पंपांचे लोडशेडिंग कमी करा

कृषी पंपांसाठी सुरू असलेले लोडशेडिंग कमी करून शेतकऱ्यांना नियमित व सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली. वीजपुरवठ्याअभावी शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याने यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

वीज बिलमाफीचा लाभ अधिक शेतकऱ्यांना द्यावा

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिलमाफी करावी तसेच साडेतीन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी आमदार जावळे यांनी केली.

जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

पावसातील खंड आणि निर्माण झालेली प्रतिकूल पीक परिस्थिती लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावेत, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली. पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

यासोबतच सिंचनासाठी पुरेसा पाणीपुरवठा, कृषी पंपांना नियमित वीज, पीक कर्जाची उपलब्धता आणि विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ शेतकऱ्यांना मिळावा, याकडेही त्यांनी संबंधित विभागांचे लक्ष वेधले.

रब्बी हंगामावरही संकट

यंदा अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामावर परिणाम झाला असून त्याचा फटका आगामी रब्बी हंगामालाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी भूमिका आमदार जावळे यांनी मांडली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ आढावा न घेता त्यावर ठोस आणि तातडीची कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

#अमोलजावळे #शेतकरी #जळगाव #दुष्काळ #रावेर #यावल #पीकविमा #वीजबिलमाफी #कृषी #शेतकरीप्रश्न #लेवाजगत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.