‘आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
‘आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’
गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
लेवाजगत न्यूज जळगाव : महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी केवळ बचतीवर अवलंबून न राहता योग्य आर्थिक नियोजन, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि भविष्यातील गरजांचा विचार करणे आवश्यक आहे. उत्पन्नानुसार मासिक खर्चाचे नियोजन, आवश्यक व अनावश्यक खर्चातील फरक, बचतीसाठी ठराविक रक्कम बाजूला काढणे तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे निश्चित करणे गरजेचे आहे. ‘आर्थिक स्वातंत्र्य हा एक पर्याय आहे’, असे मत अरुण चौबे यांनी व्यक्त केले.
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (गोदावरी आयएमआर), जळगाव आणि अॅडव्हायझर स्किल्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आर्थिक सक्षमीकरण विषयावरील ऑनलाइन कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी चौबे यांनी ‘आर्थिक स्वातंत्र्य हा एक पर्याय आहे’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून स्मार्ट बजेटिंगचे महत्त्व स्पष्ट केले. घरगुती खर्च, शिक्षण, आरोग्य, आकस्मिक गरजा आणि भविष्यातील मोठे खर्च यांचा आधीच विचार करून आर्थिक नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘उरलेल्या पैशांतून बचत’ करण्याऐवजी बचतीला मासिक आर्थिक नियोजनाचा निश्चित भाग बनवावे. छोट्या रकमेची नियमित बचत दीर्घकाळ सुरू ठेवल्यास मोठ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी निधी निर्माण करण्यास मदत होऊ शकते, हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले.
महिलांनी स्वतःच्या नावाने बचत व गुंतवणूक करण्यासोबतच आर्थिक कागदपत्रांची माहिती व्यवस्थित ठेवावी आणि कुटुंबाच्या आर्थिक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र निधी, विमा संरक्षण आणि भविष्यातील आर्थिक गरजांनुसार गुंतवणुकीचे नियोजन करण्यावरही भर देण्यात आला. आर्थिक निर्णय घेताना जोखीम, कालावधी आणि उद्दिष्ट यांचा परस्पर संबंध समजून घेणे आवश्यक असल्याचे चौबे यांनी नमूद केले.
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड आणि गोदावरी आयएमआर यांच्या सहकार्याने ‘इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम’ अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. डिजिटल फायनान्शियल टूल्सचा सुरक्षित वापर, तसेच महिलांसाठी उपलब्ध विविध शासकीय योजना व आर्थिक अधिकारांची माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यशाळेत ३५ हून अधिक महिला प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले. ऑनलाइन संवादादरम्यान सहभागी महिलांनी विविध प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांकडून शंकांचे निरसन करून घेतले. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता, नियोजन क्षमता आणि आर्थिक निर्णयक्षमता वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया सहभागींकडून व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत