भुसावळमध्ये नाभिक समाजाची भव्य शोभायात्रा; साडेचार हजार बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती
भुसावळमध्ये नाभिक समाजाची भव्य शोभायात्रा; साडेचार हजार बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती
भुसावळ : लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नाभिक संघ भुसावळ शहराच्या वतीने बुधवारी, दि. २ सप्टेंबर रोजी भुसावळ शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ७ वाजता अष्टभुजा देवी मंदिरापासून वाजत-गाजत शोभायात्रेला सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते, विविध वाद्यांचे सूर आणि संत सेना महाराजांच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.
शोभायात्रेत संत शिरोमणी संत सेना महाराज, श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री गणपती बाप्पा यांच्या मूर्ती सुशोभित रथात विराजमान करण्यात आल्या होत्या. अष्टभुजा देवी मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा नहाटा कॉलेज रोडमार्गे प्रीमियर हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या संत शिरोमणी संत सेना महाराज सामाजिक सभागृह येथे पोहोचून सांगता झाली.
दिंडी पथक ठरले आकर्षण
शोभायात्रेतील दिंडी पथक विशेष आकर्षण ठरले. भक्तिमय सादरीकरण, वाद्यांचा निनाद आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे शोभायात्रेला धार्मिक तसेच सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले.
जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमधून तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातूनही मोठ्या संख्येने नाभिक समाजबांधव भुसावळ येथे दाखल झाले होते. शोभायात्रेत तब्बल चार ते साडेचार हजार बांधवांनी सहभाग घेत समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडविले.
विविध राज्यांतील समाजबांधवांचा सन्मान
यापूर्वी १ सप्टेंबर रोजी अष्टभुजा देवी मंदिर येथे संत सेना महाराज, श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री गणपती बाप्पा यांच्या मूर्तींची विधिवत पूजा-अर्चा करून त्या सुशोभित रथात विराजमान करण्यात आल्या होत्या. त्यानंतर भक्तिमय वातावरणात मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली.
हा धार्मिक सोहळा नाभिक संघ भुसावळ शहर आणि सकल नाभिक समाज, भुसावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. शोभायात्रेचे नेतृत्व सचिन सोनवणे (बंटी भाऊ) यांनी केले. नाभिक संघ भुसावळ शहराचे अध्यक्ष संजय बोरसे, कार्यकारिणी सदस्य तसेच समाजबांधवांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
शोभायात्रेच्या सांगतेनंतर सामाजिक सभागृहात विविध शहरांतून व राज्यांतून आलेल्या नाभिक बांधवांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादानंतर श्रीमद्भगवद्गीतेच्या संगीतमय अखंड सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
संत सेना महाराजांप्रती श्रद्धा, भक्ती आणि समाजाची एकजूट यांचा संगम या भव्य शोभायात्रेतून भुसावळ शहरात अनुभवायला मिळाला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत