रावेर-यावलमध्ये लंपीचा प्रादुर्भाव; तातडीने लसीकरण करा – आमदार अमोल जावळे
रावेर-यावलमध्ये लंपीचा प्रादुर्भाव; तातडीने लसीकरण करा – आमदार अमोल जावळे
रावेर :लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
रावेर व यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये पशुधनावर लंपी स्किन डिसिज (Lumpy Skin Disease) या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.
बाधित तसेच संभाव्य बाधित गावांमध्ये तातडीने पशुवैद्यकीय पथके पाठवून जनावरांची तपासणी करावी, बाधित जनावरांचे विलगीकरण करावे, तसेच आवश्यक औषधोपचार व रोगप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार जावळे यांनी केल्या आहेत.
तसेच रावेर व यावल तालुक्यात विशेष लसीकरण मोहीम राबवून पुरेशा प्रमाणात लस, औषधे आणि पशुवैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करून जनावरांची काळजी, विलगीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अंतर्गत आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात. लंपीचा प्रादुर्भाव इतर गावांमध्ये तसेच शेजारील जिल्ह्यांमध्ये होणार नाही, यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशा सूचनाही आमदार जावळे यांनी दिल्या आहेत.
लंपी रोगामुळे बाधित अथवा मृत झालेल्या पशुधनाबाबत शासनाच्या प्रचलित नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करून पात्र पशुपालकांना शक्य ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पशुधन हे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे लंपी रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने प्रभावी उपाययोजना आणि विशेष लसीकरण मोहीम राबवावी, अशी भूमिका आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत