भुसावळच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; अनिल चौधरी, गायत्री भंगाळे यांचा शिंदे गटात प्रवेश
भुसावळच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; अनिल चौधरी, गायत्री भंगाळे यांचा शिंदे गटात प्रवेश
लेवाजगत भुसावळ : भुसावळच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि अपात्र ठरलेल्या नगराध्यक्षा गायत्री चैतन भंगाळे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा हा प्रवेश झाल्याने भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अलीकडे झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते अनिल चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने त्यांनी उमेदवारी मागे घेत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे चौधरी हे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम देत त्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या माध्यमातून लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या गायत्री चैतन भंगाळे यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या अपात्रतेच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच त्यांनी घेतलेल्या या राजकीय भूमिकेची चर्चा होत आहे.
विशेष म्हणजे अनिल चौधरी यांचे पुतणे तथा माजी आमदार संतोष चौधरी यांचे सुपुत्र सचिन चौधरी आणि निखिल चौधरी यांनीही यावेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे चौधरी समर्थकांचा मोठा गट महायुतीतील शिवसेनेत दाखल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
भुसावळच्या स्थानिक राजकारणात मंत्री संजय सावकारे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत चौधरी समर्थकांचा मोठा गट थेट शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्याने आगामी काळातील भुसावळच्या राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रवेशामुळे शरद पवार गटाला धक्का बसला असून शिवसेना शिंदे गटाची भुसावळातील राजकीय ताकद वाढल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक राजकारण आणि निवडणुकांमध्ये या घडामोडीचे दूरगामी परिणाम काय होतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत