वाढदिवसानिमित्त कडापे शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र व शैक्षणिक साहित्य वाटप
वाढदिवसानिमित्त कडापे शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र व शैक्षणिक साहित्य वाटप
प्रतिनिधी : आवरे (निलेश गावंड)
आवरे : वाढदिवस केवळ मौजमजा करून साजरा न करता सामाजिक व शैक्षणिक उपक्रमातून साजरा करण्याचा आदर्श उपक्रम रा. जि. प. शाळा कडापे येथे पाहायला मिळाला. रिहांश पाटील, निवास गावंड सर आणि शंकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र, पाणी बॉटल व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
“जे जे उत्तम ते आधी करावे, उत्तम गुण घ्यावे आणि अवगुण टाळावे,” या विचारातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक मनोबलाला बळ देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत कडापे शाळेचे मुख्याध्यापक सर्वेश ठाकूर यांनी केले. प्रमुख पाहुणे तथा रा. जि. प. शाळा आवरेचे माजी अध्यक्ष शंकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घ्यावे तसेच आई-वडील आणि शिक्षकांचा आदर्श घ्यावा,” असे आवाहन केले.
निवास गावंड सर यांनी कडापे शाळेच्या १९९२ पासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला. या कालावधीत विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती तसेच विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांनी घेतलेले अथक परिश्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढदिवसानिमित्त रिहांश पाटील यांनी रा. जि. प. शाळा कडापे तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख निर्माण करणारे ओळखपत्र वितरित केले. निवास गावंड सर यांनी विद्यार्थ्यांना पाणी बॉटल व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. प्रशांत म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक, कला साहित्य व इतर भेटवस्तू दिल्या.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष, मर्दनगड संवर्धन समितीचे अध्यक्ष तसेच उरण तालुका इको संघटनेचे अध्यक्ष शंकर गुरुनाथ पाटील, निलेश गावंड, निवास गावंड सर, स्नेहा थळी, साक्षी थळी, पल्लवी थळी, राजेश्री पाटील, प्रशांत म्हात्रे, मुख्याध्यापक सर्वेश ठाकूर सर तसेच शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सर्वेश ठाकूर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत म्हात्रे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणारा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत