चिमुकल्यासह विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू; गणेशोत्सवाच्या दिवशी जळगावात खळबळ तळेले कॉलनीतील धक्कादायक घटना; हेमांगी महाजन व चार वर्षीय शौर्यचा मृत्यू, कारण अस्पष्ट
चिमुकल्यासह विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू; गणेशोत्सवाच्या दिवशी जळगावात खळबळ
तळेले कॉलनीतील धक्कादायक घटना; हेमांगी महाजन व चार वर्षीय शौर्यचा मृत्यू, कारण अस्पष्ट
जळगाव | प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना जळगाव शहरातील दशरथनगर परिसरातील तळेले कॉलनी येथे सोमवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली. ३० वर्षीय विवाहित महिला हेमांगी निखिल महाजन आणि त्यांचा चार वर्षीय मुलगा शौर्य महाजन यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तळेले कॉलनी परिसरात महाजन कुटुंबीयांच्या घरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पाच्या स्थापनेची तयारी सुरू होती. कुटुंबातील सदस्य पूजेच्या तयारीमध्ये व्यस्त असताना हेमांगी महाजन या आपल्या मुलासह एका खोलीत गेल्या. काही वेळाने पूजेच्या वेळी कुटुंबीय त्यांना बोलावण्यासाठी खोलीकडे गेले असता दरवाजा बंद असल्याचे आढळून आले. आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीयांना संशय आला.
घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर हेमांगी महाजन आणि त्यांचा मुलगा शौर्य यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले.
हेमांगी महाजन यांचे माहेर बांभौरी, ता. धरणगाव येथे असून, त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांचे पती निखिल महाजन हे सैन्य दलात कार्यरत असून सध्या राजस्थान येथे सेवेत असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांचे दीर तळेले कॉलनी परिसरातील गणेश मंडळाचे अध्यक्ष असल्याचे सांगण्यात येते.
गणेशोत्सवाच्या दिवशीच महाजन कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि परिचितांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तपासानंतरच या घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत