Contact Banner

गोदावरी आयएमआरमध्ये ‘गोदावरी कॅम्पसच्या राजा’चे भव्य आगमन

 

godavari-imr-grand-arrival-of-godavari-campus-ganpati

गोदावरी आयएमआरमध्ये ‘गोदावरी कॅम्पसच्या राजा’चे भव्य आगमन

लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (GIMR), जळगाव येथे गणेशोत्सवानिमित्त ‘गोदावरी कॅम्पसचा राजा’ यांच्या भव्य आगमन सोहळ्यासह गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना उत्साहात पार पडली. संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके आणि डॉ. निलीमा वारके यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

गणेशोत्सवानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आकर्षक व नयनरम्य सजावट साकारली आहे. विविध कलात्मक देखाव्यांमुळे संपूर्ण गोदावरी कॅम्पस गणेशमय आणि भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला आहे.

सामाजिक बांधिलकी जपत गोदावरी फाउंडेशन व गोदावरी आयएमआर प्रस्तुत ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट’, रोटरी क्लब ऑफ जळगाव एलाईट यांच्या वतीने ‘सहयोग निधी प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत श्री गणेशमूर्ती विक्रीतून मिळणारा निधी अनाथ मुलांच्या मदतीसाठी व त्यांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमाला दिलेली जोड आणि साकारलेली कलात्मक सजावट यामुळे कॅम्पसमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या आगमन व प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.