दसनूर व सिंगनूर येथे बैल पोळा उत्साहात साजरा
दसनूर व सिंगनूर येथे बैल पोळा उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज सिंगनूर, ता. रावेर : दसनूर व सिंगनूर येथे गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी बैल पोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त बैलांना सजवून त्यांचे पूजन करण्यात आले.
दसनूर गावचे पोलीस पाटील दीपक चौधरी तसेच सिंगनूर गावचे पोलीस पाटील अभय सोनवणे यांच्या हस्ते बैलांना नैवेद्य दाखवून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी चेतन महाराज, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैल पोळा हा शेतकरी आणि बैलांच्या अतूट नात्याचा सन्मान करणारा पारंपरिक सण आहे. श्रावण किंवा भाद्रपद अमावस्येला साजरा होणाऱ्या या सणानिमित्त बैलांना अंघोळ घालून त्यांच्या पाठीवर आकर्षक नक्षीकाम केलेल्या झुली चढवल्या जातात. शिंगांना रंग देऊन बाशिंग व पायात घुंगरू बांधून बैलांना सजवले जाते.
यानंतर बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळी व गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. अनेक ठिकाणी बैलांची वाजत-गाजत मिरवणूकही काढली जाते. ज्यांच्याकडे बैल नाहीत, असे ग्रामस्थ मातीपासून तयार केलेल्या छोट्या बैलांची पूजा करून पोळा सणाची परंपरा जपतात.
शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच कृषी संस्कृती आणि ग्रामीण परंपरांचे जतन करणारा हा सण दसनूर व सिंगनूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत