Contact Banner

सप्तश्रृंगीगड–नांदुरी घाटमार्ग १० ते २६ सप्टेंबरदरम्यान बंद काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतूक बंद; गणेशोत्सव काळात भाविकांनी प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन

 

saptashrungi-nanduri-road-closed-september-10-to-26-2026

सप्तश्रृंगीगड–नांदुरी घाटमार्ग १० ते २६ सप्टेंबरदरम्यान बंद

काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतूक बंद; गणेशोत्सव काळात भाविकांनी प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन





लेवाजगत न्यूज कळवण : सप्तश्रृंगीगड ते नांदुरी घाटमार्गावरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. कश्मीरा संखे यांनी दिला आहे.

सप्तश्रृंगीगड–नांदुरी–अभोणा–कनाशी–मानूर-अलियाबाद या मार्गातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत मंजूर झाले असून, सध्या सप्तश्रृंगीगड ते नांदुरी घाटमार्गात हे काम सुरू आहे. काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवल्यास काम पूर्ण क्षमतेने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासनाला कळविले आहे.

या घाटमार्गाला वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आगामी कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत सप्तश्रृंगीगडावर जाणाऱ्या भाविकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः गणेशोत्सव काळात गडावर दर्शनासाठी जाण्याचे नियोजन करणाऱ्या भाविकांनी या वाहतूकबंदीची नोंद घेऊन त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३४ अन्वये हा आदेश जारी करण्यात आला असून, संबंधित यंत्रणांनी आदेशाची अंमलबजावणी करावी तसेच वाहतूकबंदीची माहिती प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.