तरडगाव येथील आदर्श शिक्षक कुंडलिक सानप यांचा स्तुत्य उपक्रम भजनी मंडळास सुमारे ७० हजार रुपयांची अद्ययावत साऊंड सिस्टीम भेट
तरडगाव येथील आदर्श शिक्षक कुंडलिक सानप यांचा स्तुत्य उपक्रम
भजनी मंडळास सुमारे ७० हजार रुपयांची अद्ययावत साऊंड सिस्टीम भेट
प्रतिनिधी | तरडगाव (सचिन पाटील)
“केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे” या उक्तीची प्रचिती तरडगाव येथील आदर्श शिक्षक कुंडलिक सानप सर यांच्या स्तुत्य उपक्रमातून आली आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत समाजातील कलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांनी तरडगाव येथील भजनी मंडळास अद्ययावत साऊंड सिस्टीम सप्रेम भेट दिली.
रयत सेवक व आदर्श शिक्षक म्हणून कुंडलिक सानप सर यांनी आपले आयुष्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी समर्पित केले आहे. भौतिकशास्त्र विषयावर प्रभुत्व असतानाच सामाजिक जाणिवेची जपणूक करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात भजनी मंडळाच्या विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणारी अहुजा कंपनीची सुमारे ७० हजार रुपये किमतीची अद्ययावत साऊंड सिस्टीम त्यांनी मंडळास भेट दिली. या माध्यमातून गावातील भजनी मंडळाच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून, स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन मिळणार आहे.
समाजाकडून मिळालेल्या प्रेमाचे व ऋणाचे भान ठेवून समाजातील कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी सानप सर यांनी केलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
“जे जे उत्तम ते आधी करावे” या विचाराला कृतीची जोड देत सानप सर यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत