डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात प्राचीन ज्ञानाचा आधुनिक आरोग्य व्यवस्थेत प्रभावी उपयोग करण्याचे डॉ. हर्षल बोरोले यांचे आवाहन
डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
प्राचीन ज्ञानाचा आधुनिक आरोग्य व्यवस्थेत प्रभावी उपयोग करण्याचे डॉ. हर्षल बोरोले यांचे आवाहन
लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, अध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी आयुर्वेद ही भारताची प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रशुद्ध वैद्यकीय परंपरा असल्याचे सांगितले. निरोगी जीवनशैली, रोगप्रतिबंधक उपाय आणि आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने आयुर्वेदाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्यांवर प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातून काम करताना आयुर्वेदातील जीवनशैलीविषयक तत्त्वे उपयुक्त ठरू शकतात, असे डॉ. बोरोले यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करून त्यातील शास्त्रीय ज्ञान आत्मसात करावे. तसेच समाजामध्ये आयुर्वेदाविषयी योग्य माहिती आणि जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात आयुर्वेदाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयुर्वेदाच्या ज्ञानाचा प्रसार करून समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी योगदान देण्याचा संकल्प केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत